अध्यक्षपदाची निवड “राष्ट्रवादी’च्या श्रेष्ठींसाठी डोकेदुखी..!

नगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सहकार प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून येत्या 8 मार्चला सकाळी 11 वाजता संचालक मंडळाची सभा जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली आहे. दरम्यान, अध्यक्षपद हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असून या पदासाठी इच्छुकांची संख्या व त्यासाठी पक्षश्रेष्ठींवर या त्या माध्यमातून आणण्यात येत असलेल्या दबावामुळे ही निवडी पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.
अध्यक्षपदासाठी सध्या तरी माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप यांच्यासह आमदार आशुतोष काळे, माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर हे इच्छुक आहेत. त्यात घुले व जगताप यांच्यापैकी एकाच निवड होण्याची शक्यता असल्याने दोन्ही नेत्यांकडून सध्या जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. बॅंकेचे अध्यक्ष ऍड. उदय शेळके यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक होत आहे.
जिल्हा बॅंकेत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. सर्वाधिक संचालक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याने अध्यक्षपद या पक्षाकडे देण्यात आले आहे. सध्या बॅंकेत राष्ट्रवादी 9, कॉंग्रेस 5 व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 6, एक शिवेसना तेही थोरातबरोबर आहे. असे पक्षीय बलाबल आहे.
राष्ट्रवादीमध्ये घुले व जगताप यांनी अध्यक्षपदासाठी जोरदार दावा केला असून आपण यापदासाठी कसे योग्य आहे. ते दर्शविण्याचा प्रयत्न या त्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने या हालचालींना आता वेग आला आहे.
भाजपकडून चाचपणी सुरू
भाजपने देखील अध्यक्षपदाच्या निवडीत लक्ष घालणार असल्याचे समजते. त्या दृष्टीने चाचपणी भाजपच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे. पक्षाचे संख्याबळ पाहता अध्यक्ष पक्षाचा होणार नाही हे जरी स्पष्ट असले तरी नाराज हेरून त्यांच्या बळावर अध्यक्षपद मिळू शकते का असा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्ये या पदासाठी होत असलेली चुरस लक्षात घेता. नाव कोणाचे निश्चित होणार त्यानंतर नाराज कोण होईल. त्याचा फायदा मिळविण्याचा घाट भाजपकडून घातला जात आहे. वेळप्रसंगी अध्यक्षपद नाराजांना देण्याची तयारी दर्शविली आहे.





