व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी निकोलस मादुरो यांची निवड

कारकास (व्हेनेझुएला) : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो हे विजयी झाल्याचे रविवारी घोषित करण्यात आले. मात्र निवडणुकीच्या या निकालावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. व्हेनेझुएलामधील एकाच पक्षाची सत्ता संपवण्याच्या उद्देशाने विरोधकांनी या निवडणुकीत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. मादुरो यांनी ५१ टक्के मते मिळविली आणि विरोधी उमेदवार एडमंडो गोन्झलेझ यांना ४४ टक्के मते मिनाली, असे नॅशनल इलेक्टोरल कौन्सिलचे प्रमुख एल्विस अमोरोसो यांनी सांगितले. निवडणुकीचा हा निकाल ८० टक्के मतदान केंद्रांवर आधारित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
परंतु मादुरो निष्ठावंतांचे नियंत्रण असलेल्या निवडणूक आयोगाने अद्याप प्रत्येक ३० हजार मतदान केंद्रांवरील अधिकृत मतदानाची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे मादुरो यांच्या विरोधकांनी मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करूनही तशी पडताळणी होऊ शकलेली नाही. मतदान संपल्यानंतर ६ तासांत निवडणुकांचे निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र सर्व मतदान केंद्रांवरील निकाल जाहीर न करताच मादुरो यांना विजयी घोषित केल्यामुळे या निवडणुकीच्या निकालांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रचार प्रतिनिधींकडून ३० टक्के मतदान केंद्रांवर गोळा केलेल्या आकडेवारीमध्ये गोन्झालेझ यांनी मादुरोचा पराभव केला असल्याचे विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
व्हेनेझुएलामध्ये गेल्या २५ वर्षांपासून एकाच पक्षाचे सरकार सत्तेत आहे. ही एकाधिकारशाही संपण्याची शक्यता रविवारच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या निकालांमुळे निर्माण झाली होती. अध्यक्ष निकोल्स मादुरो हे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा निवडून येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र यावेळी त्यांना विरोधकांच्या सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागले. निवृत्त मुत्सद्दी एडमंडो गोन्झलेझ यांनी एप्रिलमध्ये विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडोसाठी शेवटच्या क्षणी पर्यायी उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली. तोपर्यंत ते देशातील जनतेसाठी अपरिचित होते.





