निवडणूक आयोगाची शाई पुसली जात नाही; दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींवर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. “निवडणूक आयोगाची शाई एकदा सुकली की ती कोणत्याही प्रकारे निघत नाही, शाईबाबत केवळ संभ्रम निर्माण केला जात आहे,” असे स्पष्ट मत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
मार्कर पेनचा २०११ पासून वापर
गेल्या काही तासांपासून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात शाई पुसली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून आयोगावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “राज्य निवडणूक आयोग २०११ पासून ‘मार्कर पेन’चा वापर करत आहे. ही शाई बोटावर लावल्यानंतर ती सुकण्यासाठी साधारण १० ते १२ सेकंदांचा अवधी लागतो. कोणताही मतदार मतदान केंद्रात किमान एवढा वेळ असतोच. एकदा शाई वाळली की ती कोणत्याही रसायनाने निघत नाही.”
#WATCH | Maharashtra: On civic body elections, State Election Commissioner Dinesh T. Waghmare says, “This has come to our notice that there is some confusion being created about the ink (applied after the vote is cast), which is being put on the voters’ fingers. I want to say… pic.twitter.com/YLi5e7Yqmq
— ANI (@ANI) January 15, 2026
‘फेक नरेटिव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न
शाई पुसण्यासाठी नेलपेंट रिमूव्हर किंवा सॅनिटायझरचा वापर केला जात असल्याचा दावा आयुक्तांनी फेटाळून लावला. “आमच्या कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे, कोणाचीही शाई पुसली गेलेली नाही. भारतीय निवडणूक आयोग जी शाई वापरते, तीच शाई आम्ही वापरत आहोत. केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि ‘फेक नरेटिव्ह’ पसरवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
आयोग पूर्णतः तटस्थ
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याच्या आरोपांवर बोलताना वाघमारे म्हणाले की, आयोग पूर्णतः निष्पक्ष आणि तटस्थपणे काम करत आहे. कोणालाही झुकते माप देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुबार मतदान रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात असून, उमेदवारांचे प्रतिनिधीही मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहेत.
यावेळी आयुक्तांनी ईव्हीएम यंत्रांबाबतही माहिती दिली. यंत्रे खराब होण्याचे प्रमाण केवळ २ टक्के असून, गेल्या १० वर्षांपासून त्याच यंत्रांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मतदारांनी आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी आयोगाच्या पोर्टल आणि मोबाइल ॲपचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोग ‘इंटेल इंक’ वापरण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.





