नवी दिल्ली / तिरुवनंतपुरम: भारत निवडणूक आयोगाने केरळ, छत्तीसगड आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह या राज्यांसाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेनंतरची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध केली. या नवीन आकडेवारीनुसार, एकट्या केरळमधून २४ लाखांहून अधिक, तर छत्तीसगडमधून २७ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. केरळमध्ये २४ लाख मतदारांची कपात – केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी रतन यू. केळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पुनरीक्षण प्रक्रियेपूर्वी राज्यात २,७८,५०,८५५ मतदार होते. पडताळणीनंतर ही संख्या आता २,५४,४२,३५२ वर आली आहे. एकूण ८.६५ टक्के मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये मृत व्यक्ती ६,४९,८८५, पत्ता बदललेले (स्थलांतरित) ८,१६,२२१, गहाळ/बेपत्ता मतदार, ६,४५,५४८, दुबार नोंदणी १,३६,०२९ नावांचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये २७ लाख नावे हटवली – छत्तीसगडमध्ये १८ डिसेंबरपर्यंत चाललेल्या प्रक्रियेनंतर २७ लाखांहून अधिक नावे कमी करण्यात आली आहेत. राज्यातील २.१२ कोटी मतदारांपैकी १.८४ कोटी मतदारांनी आपली गणना प्रपत्रे जमा केली आहेत. जे मतदार इतर राज्यांत स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांनी विहित मुदतीत माहिती दिली नाही, त्यांची नावे यादीतून वगळली आहेत. अंदमान-निकोबारमध्ये ६४ हजार नावे कमी – अंदमान-निकोबारमध्ये मतदारांची संख्या ३.१ लाख होती, जी आता २.४६ लाखांवर आली आहे. येथे ६४,०१४ मतदारांची नावे हटवण्यात आली असून, त्यात ५१,९०६ मतदार स्थलांतरित किंवा अनुपस्थित आढळले आहेत. दावा आणि हरकतींचा कालावधी: २३ डिसेंबर २०२५ ते २२ जानेवारी २०२६ या काळात पात्र मतदार आपली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात.