“मामाच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे राहतील”, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातून बाहेर पडताना शिवराज सिंह चौहान झाले भावूक

भोपाळ – तब्बल साडेसोळा वर्षे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानात वास्तव्य केल्यानंतर त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अखेर आज हे निवासस्थान सोडले. ते आता लींक रोडवरील ७४ बंगला येथील बी- ८ या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.
आज मुख्यमंत्र्यांसाठी असलेले अधिकृत निवासस्थान सोडण्यापूर्वी त्यांनी तेथील गोशाळेतील गायींचे दर्शन घेतले. निवासस्थानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. मी आज हे निवासस्थान सोडतो आहे. ते माझ्यासाठी निवासस्थानासोबतच माझी कर्मभूमी होते. आज माझा केवळ पत्ता बदलला आहे. मात्र तुमच्या भावाचे, तुमच्या मामाच्या घराची दारे तुमच्यासाठी कायम खुली असतील अशी भावनिक पोस्ट शिवराज यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.
माझ्या नव्या निवासस्थानातून माझा जनसेवेचा संकल्प सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला तुमच्या मामाच्या, भावाच्या मदतीची जेंव्हा केंव्हा गरज भासेल तेंव्हा नि:संकोचपणे माझ्या या नव्या घरी या. मी तुमची सेवा करण्यापासून मागे हटणार नाही असे वचन देतो असेही शिवराज यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील सीएम हाउस हे २००५ पासून शिवराज यांचे निवासस्थान राहीले आहे. २०१८ मध्ये दीड वर्षासाठी त्यांना ही जागा सोडावी लागली होती कारण तेंव्हा कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर आले होते. मात्र त्यानंतर कॉंग्रेसमधील बंडखोरीमुळे पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि शिवराज मुख्यमंत्री झाले होते. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा अभूतपूर्व असा विजय झाला असला तरी मुख्यमंत्रिपदाने शिवराज यांना हुलकावणी दिली असून मोहन यादव राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.त्यामुळे शिवराज यांना आपला बंगला खाली करावा लागला.





