पुणे जिल्हा | पोंदेवाडीत 20 वर्षांपूर्वीचा वाद एकोप्याने मिटला

मंचर (प्रतिनिधी) – गेल्या 20 वर्षांपासून पोंदेवाडी (ता. आंबेगाव) गावात विविध राजकीय पक्षांवरून झालेली भांडण तसेच विविध कारणामुळे झालेले मतभेद व पंचवार्षिक निवडणुकीमध्ये झालेली भांडणे या मुळे एकमेकांवर जवळजवळ सहा ते सात खटले न्यायालयत सुरू होते. दरम्यान, 20 वर्षांपूर्वीचा वाद एकोप्याने ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातच बुधवारी (दि. 21) सकाळी मिटला.
ग्रामस्थ अशोक शिवाजी वाळुंज आणि तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन हनुमान मंदिरात गावातील सर्वच ज्येष्ठ, तरुण सहकार्यांना एकत्र घेत गावात मीटिंग घेतली व सदर मिटिंग मध्ये सर्व भांडणे आणि मारामारीची प्रकरणे मिटविण्याचे ठरले.
20 वर्षांपासून एकमेकांशी न बोलणारी अनेक व्यक्ती एकत्र आल्या. सर्व पक्षाची वेगवेगळी कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे भांडण-तंटा मिटवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी सरपंच बबनराव वाळुंज, नारायणराव हारके, प्रकाश हारके, जयसिंग पोंदे, सदाशिव रोडेपाटील, महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, सुशांतमहाराज रोडेपाटील, अर्जुन महाराज वाळुंज, शिवरामबुवा पोखरकर, भाऊसाहेब पोंदे, आनंदराव पोंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वाद मिटल्यानंतर एकमेकांनी अलिंगन देऊन आनंद व्यक्त केला.
500 रुपयांच्या सॅम्पवर…
गावातील काही व्यक्तींचा वाद उच्च, जिल्हा, खेड आणि आंबेगाव तालुका न्यायालय घोडेगाव येथे सुरू होता.
त्यामुळे गावात नेहमी वातावरण तणावाचे असायचे; परंतु आता वाद मिटवायचा म्हटल्यावर गावातील अशोक वाळुंज आणि तंटामुक्त समितीने पुढाकार घेत 500 रुपयांच्या स्टॅम्पवर 100 जणांच्या उपस्थितीत ज्या नागरिकांचे एकमेकांशी वाद होते त्यांचे आणि उपस्थितांच्या स्वाक्षरी घेऊन वाद मिटल्याचे जाहीर करण्यात आले आणि हा स्टॅम्प नोटरी करून विविध न्यायालयात सादर करून एकमेकांच्या संमतीने वाद मिटल्याचे लिखित दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.





