पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार

पिंपरी – पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. धरणात सध्या 91 टक्के पाणीसाठा आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने पाण्याच्या विसर्गात दुपारी एक वाजल्यापासून 3200 क्युसेस इतकी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण परिसरात बुधवारी 86 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर आत्तापर्यंत 2061 मि.मी पाऊस पवना धरण परिसरात पडला आहे. तसेच पवना धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 25 जुलै पासून पवना धरणातून विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
आज दुपारी एक वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून आणखी 1800 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातून एकूण विसर्ग 3200 क्युसेस इतका होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.




