Mandar Devasthali : वादळवाट फेम दिग्दर्शकावर मानधन थकवल्याचा आरोप; आता आणखी एका कलाकाराची पोस्ट, थेट रक्कमेचा आकडाच सांगितला

Mandar Devasthali : सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वादळवाट फेम प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे मराठी मालिका विश्वात पुन्हा एकदा कलाकारांचे मानधन थकवल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
काही वर्षांपूर्वी शशांक केतकर यांनी मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला होता. यानंतर अभिनेते विजय पटवर्धन यांनीही पोस्ट शेअर करत मानधन दिले नसल्याचा दावा केला आहे. यामुळे मानधन थकवल्याच्या प्रकरणाची जोरदार चर्चा मालिका विश्वात सुरू झाली आहे.
मालिका विश्वातील कलाकारांकडून मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर त्यांनी लवकरच पैसे मिळतील असे सांगितले होते. मात्र, अद्यापर्यंत कलाकारांचे पैसे मिळाले नसल्याचे कलाकारांकडून सांगण्यात येत आहे. आता या साऱ्यात आणखी एका कलाकाराने पैसे अजूनही मिळाले नसल्याचे म्हटलं आहे. सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेले अमित छल्लारे यांनी मानधन थकबाकी संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
अमित छल्लारे यांची इन्स्टाग्राम पोस्ट
माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीये.
नमस्कार.
मी अमित छल्लारे.
मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत मी मंदार देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. या एक वर्षात, वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला सिरिअल सोडावी लागली. पण अजूनही माझे ६,७०,१५१/- (सहा लाख सत्तर हजार, एकशे एकावन्न) रुपयांचे पेमेंट अडकले आहे, असा दावा छल्लारे यांनी इन्स्टाग्राम पोस्टमधून केला आहे.
View this post on Instagram
अभिनेते विजय पटवर्धन यांची फेसबुक पोस्ट
सुखाच्या सरींनी ……हे मन बावरे!!! ही लोकप्रिय मालिका बंद होऊन, आता जवळपास पाच ते सहा वर्ष झाली. पण, माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाही आहेत. इतकी वर्ष वाट पाहून आता नाईलाजाने मला व्यक्त व्हावे लागत आहे, असे म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.





