Gokul President Election : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचा आज होणार फैसला! शासन नियुक्त ४ संचालक मतदान करणार, पण…
राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद

Gokul President Election : गोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापुरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. ४ संचालकांच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली.
या निवडणुकीत शासन नियुक्त ४ संचालक मतदान करणार आहेत. मात्र वेगळ्या मतपेटीत ते मतदान करतील. संपूर्ण प्रक्रिया याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे आदेश देत खंडपीठाने पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.
दरम्यान, ‘गोकुळ’च्या निवडणुकीनंतर २९ ऑक्टोबरला अध्यक्ष निवडीची सभा झाली. पण, महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने ही सभा तहकूब झाली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार आज ही सभा होत असून या सभेला शासनाने विविध क्षेत्रातील चार जणांची शासकीय प्रतिनिधी नियुक्ती करत त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने महायुतीचे संचालक आता सभेला उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शशिकांत पाटील-चुयेकर तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांचे सुपुत्र रणजीतसिंह पाटील यांच्यात लढत होणार आहे.
शासन नियुक्त संचालक
राज्य सरकारने शिवाजी दिनकर आडनाईक (मु. का. पोस्ट यावलुज, ता. पन्हाळा) डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे (मु. पो. पेठवडगाव, ता. हातकणंगल), प्रशांत भगवान पाटोळे (विनायक नगर, विश्रामबाग, जि. सांगली) आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील, (मु. पो.केनवडे, ता. कागल) यांची गोकुळच्या संचालक मंडळावर शासन नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना मतदानाचा अधिकार असल्याने निवडणुकीत महायुतीचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.
महायुतीमध्ये अध्यक्षपदाचा फॉर्म्युला
महायुतीमध्ये अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. पहिल्यांदा राष्ट्रवादी, दुसऱ्या वेळी भाजप, त्यानंतर शिंदे सेना व उर्वरित कालावधी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष होणार आहे. प्रत्येकाला सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करून दिल्याचे समजते.
दरम्यान, ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्य सरकारने थेट हस्तक्षेप केल्याच्या निषेधार्थ राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.
‘गोकुळ’च्या सत्तेच्या हव्यासापोटी बहुमत नसतानाही राज्य सरकारने सहकार कायदा मोडीत काढून ‘गोकुळ’मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारचा हा डाव स्वाभिमानी कोल्हापूरकर कधीच सहन करणार नाहीत मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि राज्यभरातून या मोर्चाला मिळालेले पाठबळ पहाता ही तर महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची सुरुवात आहे, असा इशारा काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मोर्चामध्ये सोमवारी दिला होता.
हेही वाचा:





