Water supply : ‘पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका काढा’; पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
गेल्या अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांना अपुरा व अनियमित पाणीपुरवठा

पिंपरी – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नियोजनाच्या अभावामुळे हाऊसिंग सोसायट्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे ऑडिट करण्यात यावे. पाणीपुरवठा विभागाची राज्य शासनाच्या देखरेखीखाली श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड वेगाने विकसित होणारे शहर आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांना अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. शहरातील हाऊसिंग सोसायट्यांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यामुळे कार्यपद्धतीबाबत प्रश्न निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध पाण्याचे वितरण, नवीन बांधकामांना दिलेल्या परवानग्या व पाणीपुरवठा विभागातील व्यवहारांचीही तपासणी करावी. क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाणी उपलब्धता व वितरणाचा हिशेब सार्वजनिक करावा.
दररोज उपलब्ध होणारे पाणी, शहराला विविध जलस्रोतांतून मिळणारे एकूण पाणी, शुद्धीकरणानंतर वितरणासाठी किती खर्च होतो, याची माहिती द्यावी अशी मागणी फेडरेशनने केली आहे. पाणी व पाणीगळतीचे प्रमाण, क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाण्याची मागणी व पाणीपुरवठ्याचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी, टँकर पुरवठा, त्यावरील खर्च जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
‘पाणीपुरवठा सुधारणांसाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा. क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाणी उपलब्धता, प्रत्यक्ष वितरण, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, तक्रारी व त्यावरील कार्यवाही यांची माहिती मिळावी.’ – सचिन लोंढे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.





