इच्छेनुसार ‘त्या’ तिन्ही मुलांचा ताबा आजीकडे

पुणे – व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी आणि आई (सासू-सुन) मध्ये दुरावा निर्माण झाला. पाच वर्सांपूर्वी झालेल्या त्या मृत्यूबाबत सासू आणि सुनेमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर ती माहेरी गेली. तिला असलेली तिन्ही अज्ञान मुले सासूकडेच होती. त्यानंतर मुलाच्या ताब्यावरून वाद कौटुंबिक न्यायालयात पोहोचला.
मात्र, न्यायालयाने 15 वर्षांच्या मुलीची नोंदवलेली साक्ष आणि समुपदेशानात इतर दोन मुलांच्या घेतलेल्या मुलाखतीवर तिघांनाही आजीकडे राहायचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार न्यायालयाने तिघांना आजीकडेच ठेवण्याचा आदेश दिला. मात्र, त्याबरोबरच आईचे आईपण जपत तिला मुलांना भेटण्यास परवानगी देण्यात आली. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा आदेश दिला.
वडिलांच्या मृत्यूनंतर पाच वर्षे ही मुले आजीकडेच होती. त्यानंतर आईने कौटुंबिक न्यायालयामध्ये मुलांचा ताबा मिळण्यासाठी दावा दाखल केला. त्यामध्ये आईचे म्हणणे होते की, ती छोटा व्यवसाय करून पैसा कमावते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ आहे. सासुच्या कथनाप्रमाणे ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी करते. तिने पाच वर्षात मुलांचे शिक्षण, पालनपोषण आणि औषध उपचाराचा खर्च उचलला आहे. मात्र, आई ही मुलांची नैसर्गिक पालक आहे. परंतु मुलांच्या कल्याणाच्या दृष्टीने व त्यांच्या योग्य व निकोप वाढीसाठी त्यांना आजीकडे ठेवणे योग्य होईल, असा निर्वाळा देत मुलांच्या भविष्य आणि कल्याणाचा विचार करून न्यायालयाने हा आदेश दिला.
परंतु त्याच आईला भेटणे हे मुलांचा नैसर्गिक अधिकार आहे. म्हणून पंधरा दिवसांतून एकदा कौटुंबिक न्यायालयाच्या बाल संकुलामध्ये दोन तासासाठी आईला मुलांना भेटता येणार आहे. तसेच, उन्हाळी, हिवाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आईला मुले आपल्या घरी नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.





