अग्रलेख : बिझनेस महाराजा…

भारतातील सर्वात आघाडीच्या आणि नामांकित अशा टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनामुळे निश्चितच भारतातील औद्योगिक विश्वामध्ये भरून न येणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर भारताचे नाव औद्योगिक व्यासपीठावर चमकवण्याचे काम करणारे रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तानंतर केवळ औद्योगिक जगतालाच धक्का बसला असे नाही, तर सर्वसामान्य भारतीयालासुद्धा प्रचंड धक्का बसला आहे.
सर्वसाधारणपणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगाची उभारणी करणारे आणि ते उद्योग नावारूपाला आणणार्या उद्योगपतींकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते. पण भारतीय औद्योगिक जगताच्या क्षितिजावर रतन टाटा हा एकमेव तारा असा होता ज्यांच्याबाबत कधीच कोणी कोणतीही शंका घेतली नाही आणि कोणता आरोपही झाला नाही. म्हणूनच भारतीय औद्योगिक साम्राज्याचे अनभिषिक्त महाराजा म्हणूनच रतन टाटा यांच्या नावाची नोंद केली जाते. एखादा लोकप्रिय सम्राट ज्या प्रकारे आपल्या साम्राज्याची आणि साम्राज्यातील जनतेची काळजी घेतो त्याच प्रकारे रतन टाटा यांनी दीर्घकाळ आपल्या औद्योगिक साम्राज्यातील कर्मचार्यांसह ग्राहकांचीसुद्धा काळजी घेतली. भारतातील ज्या उद्योग समूहाला 150 वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे आणि स्वातंत्र्यपूर्वक काळातसुद्धा ज्या उद्योग समूहाने भारताच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लावला होता त्या टाटा उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करणारे रतन टाटा यांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये टाटा उद्योग समूहाला वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवण्याचे काम केले.
ज्या कालावधीमध्ये म्हणजे 1991 मध्ये रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्स या प्रमुख कंपनीची धुरा आली त्याचवेळी भारतात नवीन आर्थिक धोरणाला सुरुवात झाली होती. त्यामुळे जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण याचे जे फायदे उद्योगपतींना मिळणार होते त्याचा योग्य अर्थ लावून रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाचा विकास करण्यासाठी या नव्या आर्थिक धोरणाचा योग्य प्रकारे फायदा करून घेतला. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा म्हणून रतन टाटा यांची इनिंग आणि भारतातील नव्या आर्थिक धोरणाची सुरुवात एकाच वेळी झाली हा योगायोग जरी असला, तरी या आर्थिक धोरणाचा अर्थ समजून घेऊन तो आपल्या उद्योगांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे अवलंबण्याचे काम रतन टाटा यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये जरी टाटांचे सर्व उद्योग फक्त कोअर सेक्टरमध्ये मोडणारे होते. म्हणजेच स्टील टेक्स्टाइल यामध्ये जरी टाटा उद्योगाने आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी नंतर रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा उद्योग समूहाने समाजाला उपयुक्त ठरणार्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांमध्ये आपला उद्योग विस्तारत नेला.
1991 ते 2012 या कालावधीमध्ये रतन टाटा यांनी टाटा सन्स या प्रमुख कंपनीची धुरा सांभाळली. या काळात ‘टाटा’ या नावाला जे वलय होते त्याचा योग्य प्रकारे वापर करून रतन टाटा यांनी काल सुसंगत असे धोरण स्वीकारून आधुनिक काळामध्येसुद्धा आपले धोरण सर्वसामान्यांच्या उपयोगाला कसे पडेल याकडे जास्त लक्ष दिले. म्हणूनच आज टाटा उद्योग समूहातील टाटा प्ले डिश टीव्ही कंपनी आघाडीवर मानली जाते. या व्यतिरिक्त टाटा मोटर्स ही कंपनीसुद्धा आता अनेक आघाड्यांच्या मोटार कंपन्यांबरोबर स्पर्धा करत आहे. फोर्ड कंपनीशी निगडित असलेली जग्वार लँड रोवर ही कंपनी टेक ओव्हर करून रतन टाटा यांनी आपण किती सक्षम आहोत हे केवळ ब्रिटनला नाही तर सार्या जगाला दाखवून दिले होते.
आपल्या दीर्घ कालावधीमध्ये असे अनेक निर्णय घेताना खरे तर वादग्रस्त होण्याचाही धोका होता. पण रतन टाटा कधीही वादग्रस्त झाले नाहीत. एकच अपवाद होता तो म्हणजे त्यांच्या निवृत्तीनंतर जेव्हा त्यांनी सायरस मिस्त्री यांची आपला वारसदार म्हणून नियुक्ती केली होती त्यानंतर सायरस यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत वाद झाल्यामुळे रतन टाटा यांनी चारच वर्षांमध्ये सायरस यांना पदावरून दूर करून पुन्हा एकदा स्वतः ते पद स्वीकारले होते. हा विषय प्रथम कंपनी संदर्भात लवादामध्ये आणि नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. पण सुप्रीम कोर्टानेसुद्धा तेव्हा रतन टाटा यांचीच बाजू उचलून धरली होती हे महत्त्वाचे आहे.
आपल्या सर्वच उद्योगांमध्ये त्यांनी एक वेगळी अशी कार्यसंस्कृती निर्माण केली होती. त्यामुळे टाटा उद्योगाशी संबंधित कोणत्याही कंपनीमध्ये नोकरी मिळणे म्हणजे सरकारी नोकरी मिळणे असे समजले जाते. टाटा उद्योग समूहाच्या कंपन्यांमध्ये नोकरी करणे हा एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे. अनेक कंपन्यांची तुलना करता टाटा कंपन्यांमधील कर्मचार्यांनी आपली नोकरी बदलण्याचे प्रमाण कमी आहे. कारण रतन टाटा यांनी आपल्या सर्वच कंपन्यांमध्ये एक सकारात्मक अशी कार्यसंस्कृती निर्माण केली. अत्यंत साधी राहणी, कोणताही बडेजाव न करता कंपनीचा कारभार पाहणे, गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात न येणे ही पथ्य रतन टाटा यांनी नेहमीच पाळली. एखाद्या सर्वसाधारण कर्मचार्याच्या किंवा ग्राहकाच्या तक्रारीची रतन टाटा यांनी व्यक्तिशः दखल घेतल्याची अनेक उदाहरणे सांगितली जातात.
टाटा उद्योगांमध्ये काम करणारे लाखो कर्मचारी असोत किंवा टाटांच्या अनेक सेवांचा लाभ घेणारे कोट्यवधी ग्राहक असोत सर्वांसाठी रतन टाटा हे एक ‘बिझनेस महाराजा’ होते. रतन टाटा यांना जरी आजपर्यंत अनेक प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असले, तरी ‘भारतरत्न’ पुरस्कार मात्र त्यांना देण्यात आला नव्हता. आता मात्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, हा एक उपचार ठरणार आहे कारण ज्या प्रकारे देशात काही नवरत्न कंपन्या कार्यरत आहेत आणि त्या भारताचे नाव रोशन करत आहेत त्याचप्रमाणे भारतातील जे नवरत्न उद्योगपती आहेत त्यातील कोहिनूर हिरा हे रतन टाटा होत. म्हणून नावातच रतन असलेल्या या बिझनेस महाराजाला भारतरत्न देणे हा केवळ आता एक उपचारच ठरणार आहे.
रतन टाटा जरी आज शरीराने भारतीय औद्योगिक क्षितिजावरून लुप्त झाले असले, तरी त्यांनी टाटा उद्योग समूहातील विविध कंपन्यांच्या निमित्ताने जे काम करून ठेवले आहे ते आगामी कालावधीमध्ये सर्वांना दिशादर्शक ठरणार आहे, हे निश्चित. भारताच्या औद्योगिक प्रगतीला मोलाचा हातभार लावणार्या या महान उद्योगपतीला भावपूर्ण श्रद्धांजली.





