- पिंपरी चिंचवडमधील “लॉकडाऊन’ इफेक्ट
- नागिरकांच्या कचऱ्याबाबत तक्रारीच नाहीत
पिंपरी – एकीकडे करोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासही हा व्हायरस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोवर नेहमीपेक्षा दररोज तब्ब्ल 350 मेट्रिक टन कचरा कमी जमा होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
करोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासारखी चांगली दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. करोनामुळे मानवनिर्मित कचराही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. शहरात 24 मार्च पासून लॉकडाऊन झाले. लॉकडाऊनमुळे नागरिकांकडून होणारे बाहेरचे सर्वच व्यवहार बंद असल्याने साहजिकच कचरा निर्मितीचे प्रमाणही कमी झाले.
करोना संकटाच्या पूर्वी विशेषत लॉकडाऊनपूर्वी दररोज साधारण 1050 ते 1150 टन कचरा महापालिकेच्या कचरा डेपोवर जात होता. 24 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर मात्र कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाले आहे. आता दररोज 700 ते 822 टन कचरा आता जमा होत आहे. यामुळे कचरा संकलन तब्ब्ल 300 ते 350 टन घटले आहे.
कचरा कुंड्या रिकाम्या
गेल्या 15 दिवसांपासून हॉटेल, चायनीज टपऱ्या, इतर दुकाने बंद असल्याने शहरात ठिकठिकाणी ठेवलेल्या कचरा कुंड्या रिकाम्या दिसून येत आहे. “लॉकडाउन’मुळे शहरातील सर्व व्यवहार बंद असल्याने कचरा कुंड्या रिकाम्या आहेत. लॉकडाउन नंतरच्या काळात कचरा संकलनाबाबत नागरिकासह नगरसेवकांच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांची डोकेदुखी कमी झाल्याचे दिसते.
दीड कोटीची बचत – डॉ. रॉय
महापालिकेने कचरा सकलनाचे काम खासगी ठेकेदाराला दिले आहे. टन या दराप्रमाणे ठेकेदाराला मोबदला दिला जातो. या कचरा सकलनाच्या करारात शहरातून दररोज 1050 ते 1150 मेट्रिक टन कचरा निघतो व तो ठेकेदाराकडून उचलण्यात येतो. टन या दराप्रमाणे ठेकेदाराला 1700 रुपये दिले जातात. शहरातील कचरा उचलण्यासाठी दररोज साधारण 5 लाख खर्च येतो. या सरासरीने गेल्या पंधरा दिवसात दररोज 350 टन कचऱयाची घट झाल्याने पालिकेचे दीड कोटी रुपये वाचले आहेत, असे आरोग्य अधिकारी डॉ अनिल रॉय यांनी सांगितले.