Waqf Board Bill : “देशाला याचे परिणाम भोगावे लागतील..”; वक्फ दुरुस्ती विधेयकाला मेहबूबा मुफ्ती यांचा विरोध

Waqf Board Bill – पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी अर्थात पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यास तीव्र विरोध व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ‘भाजपच्या गेल्या १० वर्षांपासून मुस्लिमांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा हा एक भाग आहे. आता ते वक्फ दुरुस्ती विधेयक आणून आमची मालमत्ता हिसकावून घेऊ इच्छितात.
आपला देश जगभर बंधुता आणि गंगा-जमुनी संस्कृतीसाठी ओळखला जात होता, पण भाजप ही गोष्ट विसरली आहे. त्यांना वाटते की, आज भाजप सरकार आहे, पण उद्या राहणार नाही. जर ते निघून गेले नाही, तर संपूर्ण देश कोसळेल. सध्याचे सरकार मुस्लिमांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहे आणि भविष्यात संपूर्ण देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.’ असं त्या म्हणाल्या आहेत.
वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय?
‘वक्फ’ हा अरबी शब्द आहे. अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेल्या संपत्तीला ‘वक्फ’ असं म्हणतात. स्थावर आणि जंगम दोन्ही मालमत्ता वफ्फच्या कार्यक्षेत्रात येतात. भारताच्या वक्फ मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीमधील माहितीनुसार देशात एकूण 30 वक्फ बोर्ड आहेत.
जवाहरलाल नेहरू सरकारने 1954 मध्ये ‘वक्फ कायदा’ केला. सन 1995 मध्येही वक्फ कायद्यातही बदल करण्यात आले, त्यानंतर प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. या कायद्यात दाव्यापासून वक्फ मालमत्तेची देखभाल करण्यापर्यंत अनेक तरतुदी आहेत.





