पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – देशसेवेची स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण… नवनव्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याचा आत्मविश्वास… लष्करी बँड पथकाच्या कदम कदम बढाये जा… सारे जहाँ से अच्छा, या गाण्यांच्या तालावर शिस्तबद्ध संचलन अशा दिमाखदार व उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) १४६ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी पार पडला. पहाटेच्या रम्य वातावरणात बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील क्वाटर डेकचा उघडलेला दरवाजा आणि त्यातून विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बॅण्डचे झालेले आगमन, त्यापाठोपाठ प्रबोधिनीच्या छात्रांच्या मैदानावर झालेल्या प्रवेशामुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आला. यावर्षी सातारा सैनिक स्कूलचा विद्यार्थी आणि शेतकरी पुत्र शोबीत गुप्ता हा राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. या वेळी छात्रांनी पुढच्या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम’ पाऊल ओलांडत जल्लोष केला. या संचलनाला चेतक हेलिकॉप्टर आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोहळ्याचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एनडीएच्या १४६व्या तुकडीत बटालियन कॅडेट कॅप्टन शोभित गुप्ता याने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम राहिल्याबद्दल राष्ट्रपतींचे सुवर्णपदक जिंकले, तर अकादमी कॅडेट ऍडज्युटंट माणिक तरुण याने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रपतींचे रौप्यपदक जिंकले. अन्नी नेहराने तिसरे स्थान पटकावून राष्ट्रपतींचे कांस्यपदक पटकावले. गोल्फ स्क्वाड्रन प्रतिष्ठित ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’चे मानकरी ठरले. जगात मोठ्या प्रमाणात अशांतता पसरली आहे. काही जणांमध्ये लष्करी संघर्ष सुरू आहेत. येणारा काळ हा आव्हानात्मक आहे, तसेच पारंपरिक युद्ध पद्धतही बदलत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडणाऱ्या भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांना या बदलत्या युद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. त्या दृष्टीने देशासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. – मनोज पांडे, लष्करप्रमुख जनरल ३३७ कॅडेट देशसेवेसाठी सज्ज एनडीएच्या कोर्सच्या पासिंग आऊट परेडमध्ये एकूण १२६५ कॅडेट्स सहभागी झाले. ज्यामध्ये ३३७ कॅडेट हे पास आऊट झाले. या अभ्यासक्रमात १० मित्रराष्ट्रांचे १९ कॅडेट देखील पास आऊट झाले. यात भूतान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीव यांसारख्या देशांचा समावेश आहे. आज पास आऊट झालेल्या ३३७ कॅडेटपैकी १९९ आर्मी कॅडेट्स, ३८ नेव्हल कॅडेट्स आणि १०० एअर फोर्स कॅडेट्सचा समावेश आहे. सध्या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टर्ममध्ये असलेल्या २४ महिला कॅडेट्सच्या तुकडीनेही या परेडमध्ये भाग घेतला. सातारा सैनिक स्कूलच्या शोभितला सुवर्णपदक पदवीदान प्रदान सोहळ्यात बीएसस्सीमधून पहिला आलेला आणि तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणातून पहिला येत राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेल्या शोभित गुप्ता याचे आपल्या शेतकरी आई- वडिलांना पाहताच डोळे पाणावले. लष्कराची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शोभितने हे यश मिळवले आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या शोभितने सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवला. येथे सहा वर्षांचे शिक्षण घेत पहिल्याच प्रयत्नात एनडीएत प्रवेश मिळवला. त्याने लष्करात जाण्याचा निर्णय घेतला असून, तो त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय रक्षा अकादमी येथे जाणार आहे. शोभित म्हणाला, माझे आई बाबा शेतकरी असून, त्यांना एनडीए काय आहे, हे देखील माहीत नव्हते. मला आमच्या गावातील सैनिकाने सहावीत असताना सातारा सैनिक स्कूलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच मी एनडीएमध्ये येऊ शकलो. माझ्या आई- बाबांचे स्वप्न आज पूर्ण करू शकलो. हरियाणाच्या माणिक तुरणला रौप्यपदक राष्ट्रपती रौप्यपदकाचा मानकरी ठरलेला माणिक तुरण हा मूळचा हरियाणा येथील असून, त्याने त्याचे शिक्षण सैनिक स्कूल डेहराडून येथून पूर्ण केले. त्याचे वडील हे शिक्षक असून, आई देखील शिक्षिका आहे. त्याला नौदलात जायचे आहे. त्याचे आजोबा हे लष्करात होते. त्यांच्यापासून त्याला सशस्त्र दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. बेळगावचा अन्नी नेहरा कांस्यपदकाचा मानकरी कांस्यपदकाचा मानकरी ठरलेला अन्नी नेहरा याने त्याचे शालेय शिक्षण हे सैनिक स्कूल बेळगाव येथून पूर्ण केले. या ठिकाणी त्याला लष्करात येण्याची प्रेरणा मिळाली. तेथे सहा वर्षे प्रवेश परीक्षेची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात एनडीएमध्ये प्रवेश मिळवला. त्याचे लष्करात जाण्याचे स्वप्न असून, पुढील लष्करी प्रशिक्षणासाठी तो राष्ट्रीय रक्षा अॅकॅडमीत जाणार आहे.