कॉंग्रेसने सादर केले दहशतवाद्यांचे भाजपशी संबंध असल्याचे पुरावे

नवी दिल्ली – दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी कॉंग्रेस शनिवारी देशभरातील 22 शहरांमध्ये एकाच वेळी पत्रकार परिषदा घेऊन चांगलीच राळ उडवून दिली आहे. भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची उदाहरणे पत्रकार परिषदांमध्ये सादर करून भाजपच्या खोट्या राष्ट्रवादाची त्यांनी पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या “बनावट राष्ट्रवादाच्या दाव्यांचा” विरोध करणे आणि सत्ताधारी पक्षाचे गंभीर गुन्हे आणि दहशतवादी कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींशी भाजपचे जे संबंध आहेत त्याचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश असल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले. आज आमचे 22 ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते 22 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड करतील, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर सांगितले.
त्यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांचे भाजपशी संबंध असल्याचे पुरावे आहेत या नात्याला काय म्हणतात, असा सवालही त्यांनी केला आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लालच्या हत्येतील प्रमुख आरोपी रियाझ अटारी हा भाजपचा सदस्य असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. तसेच राजस्थानमधील भाजप नेत्यांसोबतचे त्यांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.
अमरनाथ आपत्तीतील 15 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी तालिब हुसैन शाह ज्याला अलीकडेच श्रीनगरमधील रियासी शहरात पकडण्यात आले होते, तो जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा पदाधिकारी होता, असा दावाही कॉंग्रेसने केला आहे. काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट रचणारा तालिब हुसैन शाह अमित शहांसोबतच्या छायाचित्रात कसा दिसला, असा सवाल कॉंग्रेस नेते पवन खेरा यांनी केला आहे. हा सुरक्षेचा भंग तर नाही ना, असा प्रश्न त्यांनी केला आहे.





