Sanjay Raut : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पाठिंबा देणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते. पण अखेरच्या क्षणी नाट्यमय घडामोड घडली आणि अचानक उबाठाने भाजपला पाठिंबा देण्याची ठरवले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्यात दोन परस्परविरोधी पक्ष असताना चंद्रपूरमधील भाजप-उबाठाच्या युतीचे चित्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. यावर अखेर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाने अधिक गंभीरपणे शिवसेनेच्या नगरसेवकांशी चर्चा करण्याची गरज होती, असे स्पष्ट मत व्यक्त केले. तिथे काँग्रेसचे दोन गट असल्याने शेवटपर्यंत एकवाक्यता झाली नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील भाजप उबाठा युतीवर दिली आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? “चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी कालही सांगितलं आहे. काँग्रेस पक्षाने अधिक गंभीरपणे शिवसेनेच्या नगरसेवकांशी चर्चा करण्याची गरज होती. त्यात वंचितचेही लोक होते. पण दुर्देवाने तिथे काँग्रेसचे दोन गट असून, त्यांच्यात शेवटपर्यंत एकवाक्यता झाली नाही. आम्ही त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोललो. खासदार धानोकर, विजय वडेट्टीवार यांच्याशीही बोलणं झालं. दोघांमध्येही एकमत होत नव्हतं. अशावेळी स्थानिक राजकारणात उलथापालथ झाली आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला.“ पुढे बोलताना संजय राऊत यांनी “उद्धव ठाकरे यांची कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करण्याची भूमिका नव्हती आणि आजही नाही. ज्या भाजपाने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरण्यास मदत केली अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होते, असा खुलासा संजय राऊत यांनी केला. सत्तेसाठी तडजोड करणं माझ्यासारख्याला न पटणारी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरमधील युतीबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपासोबत जाणं पाप आहे आणि हा महाराष्ट्राला न पटणारा विचार आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, ती उद्या राहण्याची शक्यता नाही. पण शिवसेना हा डाग लावू इच्छित नाही. गेली अनेक वर्षं आम्ही त्यांच्याशी संघर्ष करत असताना, आता सत्तेसाठी तडजोड करणं माझ्यासारख्याला न पटणारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांसोबत साधलेल्या संवादात सांगितले. राऊतांचा सल्ला शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या दोन गटात एकवाक्यता झाली नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची जबाबदारी जास्त होती. उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती, असे म्हणत काँग्रेसच्या भूमिकेवर निशाणा साधला. तुम्ही आत्मचिंतन करावं असा सल्ला संजय राऊतांनी दिला. मुंबईत काय घडणार? या सगळ्यात उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत. कदाचित दोन तीन दिवसात त्यांना मुंबईत पाचारण केले जाईल आणि त्यानंतर पुढील माहिती देईल, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चंद्रपूरात भाजप-उबाठाची झालेल्या युतीवर उद्धव ठाकरे मुंबईत उबाठाच्या नगरसेवकांसोबत काय चर्चा करणार? संबंधित नगरसेवकांवर कारवाई होणार की आणखी काय घडणार? यासाठी वाट पाहावी लागली. हेही वाचा : New Labor Code : ‘आठवड्यात ४८ तास काम करा आणि सुट्टी घ्या’; विकसित देशातील पॅटर्न राज्यात लागू होणार