खड्डे, अतिक्रमणांवरून आयुक्त संतापले; चार दिवसात खड्डे दुरुस्त न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा

पुणे – शहरात पावसाला सुरूवात होताच; शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डयांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली असून रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यातच, राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने या समस्यांबाबत आमदारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अतिक्रमण कारवाई होत नसल्याने तसेच रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिका आयुक्तांनी मंगळवारी या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत थेट जाब विचारला.
तसेच चार दिवसात शहर अतिक्रमण मुक्त तसेच खड्डे मुक्त न झाल्यास अधिकाऱ्यांसह, अभियंत्यांवरही कारवाईचा इशारा दिला. महापालिकेचे 15 क्षेत्रीय अधिकारी, परिमंडळ उपायुक्त, अतिक्रमण निरिक्षक तसेच पथ विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांकडून पावसाळयापूर्वी पासून शहरातील खड्डे , रस्ते दुरूस्ती, अतिक्रमणे, अनधिकृत होर्डींग्जवरील कारवाई याबाबत बैठका घेतल्या जात असून प्रत्येक सोमवारी सर्व विभाग प्रमुखांना या कामांचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात येत आहे.
मात्र, सुरूवातीला काही प्रमाणात कारवाई झाल्यानंतर या सर्व कारवाया थंडावल्या आहेत. तसेच, शहरात जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाला सुरूवात झाल्याने शहरातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे दिसू लागले आहेत. तसेच खड्डयांमुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीसही सुरूवात झाली आहे.
अधिवेशनाचीही धास्ती?
दरम्यान, राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे माध्यमांतून आलेल्या बातम्यांचा आधार घेत आमदारांकडून तारांकीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, उत्तरे देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबईची वारी करावी लागत आहे. त्यामुळेही आयुक्तांनीही नाराज असल्याने आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले जात आहेत.





