अभिनेते दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील घराची पडझड

पेशावर – पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात असलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे वडिलोपार्जित घर जरी पाकिस्तानने राष्ट्रीय स्मारक जाहीर केले असले, तरी हे घर आता पूर्ण मोडकळीस आले आहे.
अलिकडच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे या घराची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. घर अगदी पडण्याच्या बेतात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या घराचे नुतनीकरण करण्याच्या योजना आता पूर्ण रद्द कराव्या लागणार असल्याचे चित्र आहे.
दिलीप कुमार यांचा जन्म १९२२ साली पेशावर शहरातल्या ऐतिहासिक किस्सा ख्वानी बजारच्या मागील बाजूस असलेल्या मोहल्ला खुदादद भागातल्या घरी झाला. दिलीप कुमार यांचे वयाच्या १२ वर्षांपर्यंतचे बालपण येथेच गेले. त्यानंतर १९३२ साली ते तत्कालिन भारतात स्थलांतरित झाले होते.
पाकिस्तानने १३ जुलै २०१४ रोजी दिलीप कुमार यांचे हे घर राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित केले होते. पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हा निर्णय घेतला होता. दिलीप कुमार यांनी एकदाच या घराला भेट दिली होती आणि आपल्या वडिलोपार्जित घराच्या मातीला अभिवादन केले होते.
अलिकडच्या काळात खैबर पख्तुनख्वा प्रांतात झालेल्या मुसळधार पावसामध्ये दिलीप कुमार यांच्या घराचे आतोनात नुकसान झाले आहे, असे खैबर पख्तुनख्वा या प्रांताच्या वारसा स्मरक कौन्सिलचे सचिव शकील वहिदुल्लाह खान यांनी म्हटले आहे. या घराचे बांधकाम १८८० साली केले गेले आहे.
या वास्तूच्या नुतनीकरणासाठी खैबर पख्तुनख्वा प्रांताला वारंवार मोठ्या निधीची हमी देण्यात आली होती. मात्र तरीही या वारसास्थळाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. ही वास्तू इतकी जूनी आहे, की या वास्तूची देखभालीची जबाबदारी सरकारचीच असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारसा स्थळ विभागाच्यावतीने या वास्तूच्या देखभालीकडे दाखवण्यात येणाऱ्या निष्काळजीपणाबद्दल स्थानिक सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित केलेली ही वास्तू पडण्यापासून वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नसल्याची भावना व्यक्त होते आहे.
दिलीप कुमार यांचे वडिलोपार्जित घर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत असतात. मात्र घराची झालेली पडझड बघून त्यांचाही हिरमोड होतो. दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराला राष्ट्रीय वारसा वास्तूचा दर्जा दिल्यापासून मुहम्मद अली मीर यांच्याकडे या घराच्या देखभालीची जबाबदारी सोपण्यात आली आहे.
मात्र दुर्दैवाने त्यांचे घर कोसळण्यापासून वाचवण्यासाठी पुरालेख विभाग काहीही करू शकला नाही. घराची होणारी पडझड असहायतेने बघावी लागत असल्याची भावना त्यांनीही व्यक्त केली.
दिलीप कुमार यांना होते पेशावरबद्दल प्रेम…
दिलीप कुमार यांना पेशावरच्या लोकांबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. पेशावर शहराला नेहमी त्यांच्या हृदयात स्थान होते आणि त्यांच्या बालपणीच्या आठवणींना ते नेहमी उजाळा देत असत.
७ जुलै २०२१ रोजी मुंबईत वयाच्या ९८ व्या वर्षी या महान अभिनेत्याचे निधन झाले. त्यांना १९९७ मध्ये निशान-ए-इम्तियाज, पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता.





