निर्दयीपणाचा कळस; ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये रेप, मर्डर केसच्या यापूर्वीही घडल्या घटना

Kolkata Rape-Murder Case । पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी आंदोलने देखील सुरू आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे सीबीआय तपासाचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जींच्या सरकारवर विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. बंगालमध्ये 2011 ते 2024 या 13 वर्षांच्या ममता बॅनर्जींच्या सरकारच्या काळात अशा यापूर्वीही घटना घडल्या आहेत, ज्याने एकच खळबळ उडाली. ती प्रकरण कोणती त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात.
– पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरण
फेब्रुवारी 2012 मध्ये कोलकात्याच्या पार्क स्ट्रीट येथील नाईट क्लबमधून बाहेर पडल्यानंतर सुझेट जॉर्डन नावाच्या महिलेवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी ही खोडसाळ कथा म्हणून फेटाळून लावली, परंतु या प्रकरणावर गदारोळ उठल्याने अखेर हल्लेखोरांना अटक करण्यात आली आणि दोषी ठरविण्यात आले. ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यानंतर वर्षभरानंतर ही घटना घडली होती.
– कामदुनी सामूहिक बलात्कार आणि हत्या
कोलकाताजवळील कामदुनी गावात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. परीक्षा देऊन घरी परतत असताना ही घटना घडली होती. या गुन्ह्याच्या क्रूरतेने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणाचा देशभरातून निषेध करण्यात आला.
– मध्यमग्राम बलात्कार प्रकरण
ऑक्टोबर 2013 पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राममध्ये एका 16 वर्षीय मुलीवर दोन दिवसांत दोनदा सामूहिक बलात्कार करण्यात आला. तक्रार दाखल केल्यानंतर, पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला धमकावण्यात आले आणि नंतर ती रहस्यमय परिस्थितीत मृत आढळून आली.
– बामनघाटा बलात्कार प्रकरण
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बामनघाटा येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर महिलांसाठी चांगल्या कायद्याची अंमलबजावणी आणि संरक्षणाची गरज अधोरेखित केली.
– संदेशखळी बलात्कार प्रकरण
ऑक्टोबर 2020 मध्ये उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. स्थानिक तरुणांनी केलेल्या या गुन्ह्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, त्वरीत न्याय देण्याची मागणी होत आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रकरण घडल्याने या प्रकरणावर राज्यभर गदारोळ झाला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी यावरून बरेच राजकारण झाले होते.
– हंसखळी बलात्कार आणि हत्या प्रकरण
एप्रिल 2022 मध्ये, नादिया जिल्ह्यातील हंसखळी येथे एका 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. गुन्हेगारांना संरक्षण देण्यात राजकीय प्रभाव असल्याच्या आरोपामुळे या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. राजकीय प्रभावामुळे आरोपींवर गुन्हे दाखल केले जात नसून ही बाब उघडकीस येताच मयताला जाळून मारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. गुन्हेगारी तपासातील राजकीय हस्तक्षेप आणि राज्यातील तरुण मुलींच्या सुरक्षेबाबतच्या चिंता या प्रकरणाने अधोरेखित केल्या.
– डायमंड हार्बर सामूहिक बलात्कार प्रकरण
जून 2023 रोजी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बरमध्ये एका महिलेवर पुरुषांच्या गटाने सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेचा निषेध आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रकरणावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले होते.
– आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार आणि हत्या प्रकरण
ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका तरुण महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे देशभरात व्यापक निषेध झाला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणी देशभरातून केली जात आहे.
हेही वाचा:
“4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा” ; शरद पवार यांचे केंद्र सरकारला आव्हान





