पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जाणवतोय रक्ताचा तुटवडा

कोविड रुग्णांसाठी प्लाझ्माचीही कमतरता
‘ए’, “एबी पॉझिटिव्ह’ रक्त गटासह निगेटिव्ह गटाचे रक्त मिळविण्यात अडचणी
पिंपरी – शहरामध्ये सध्या करोना संसर्गामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटले आहे. पर्यायाने रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळण्यात अडचणी येत आहे. त्याचबरोबरीने सध्या पॉझिटिव्ह रक्तगटातील “ए’ आणि “एबी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे रक्त देखील मिळणे मुश्किल झाले आहे. प्लाझ्मा थेरपीची आवश्यकता असलेल्या करोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.
करोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे सध्या रक्तदानासाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. पर्यायाने, रक्तदान शिबिर देखील कमी झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात काही संस्थांच्या मदतीने रक्तदान शिबिर झाले. त्यामुळे काही प्रमाणात रक्ताची गरज भागली. सध्या शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळणे कठीण झाले आहे. त्याचबरोबरीने पॉझिटिव्ह रक्तगटामध्ये “ए’, “एबी पॉझिटिव्ह’ या रक्तगटाचे रक्त मिळण्यात अडचणी जाणवत आहेत. वायसीएम रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा आहे.
करोना संसर्गामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने प्रामुख्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे रक्तपेढीतून सांगण्यात आले. रक्तपेढ्यांकडे रक्तदात्यांची सूची आहे. त्यामुळे मागणीनुसार रक्तदात्यांना विनंती करून रक्ताची गरज भागविली जात आहे. रक्ताच्या तुटवड्यामुळे आवश्यक रक्तगटाचे रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
रक्तदानाने प्रमाण निम्म्यावर
करोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती, रक्तदानासाठी रक्तदात्यांकडून मिळणारा अपुरा प्रतिसाद, शाळा-महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान शिबिरांचे घटलेले प्रमाण, औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातूनही होणारे अत्यल्प रक्तदान आदी प्रमुख कारणांमुळे सध्या रक्तदानाचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. ज्या रक्तपेढ्यांमध्ये दरमहा 500 रक्तपिशव्या उपलब्ध असत. तिथे आता 200 ते 250 इतक्याच रक्त पिशव्या उपलब्ध होत आहेत.
“प्लाझ्मा’चाही तुटवडा
प्लाझ्मा थेरपीची आवश्यकता असलेल्या करोनाबाधित रुग्णांना रक्तातील “प्लाझ्मा’ नावाच्या घटकाची गरज लागते. प्लाझ्मामध्ये “ऍन्टीबॉडीज’ असतात. त्यालाच सैनिकी पैशी असेही म्हणतात. रुग्णाच्या शरीरामध्ये करोना विषाणूचा प्रवेश झाला की त्या विषाणूला नष्ट करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी केली जाते. या थेरपीमध्ये करोना आजारातून बरे झालेल्या आणि 28 दिवसांच्या अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या रुग्णांच्या रक्तातून प्लाझ्मा काढण्यात येतो. “प्लाझ्मा ऍन्टीबॉडीज’ करोनाची लागण झालेल्या रुग्णाला दिल्या जातात. सध्या करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्लाझ्माची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. मात्र, तुलनेत प्लाझ्माचाही मोठा तुटवडा जाणवत आहे.
रक्तासाठी असलेल्या मागणीच्या तुलनेत होणारे रक्त पिशव्यांचे संकलन कमी आहे. निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा आहे. तसेच पॉझिटिव्ह रक्तगटात “एबी’ पॉझिटिव्ह रक्त मिळण्यात अडचणी येत आहेत. करोनाच्या परिस्थितीमुळे सध्या रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटले आहे. त्याशिवाय, करोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक प्लाझ्मा दान करण्यासाठी करोना आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे यायला हवे.
– राजेंद्र देसाई, अध्यक्ष, मोरया ब्लड बॅंक, चिंचवड.





