लहान मुलांचा वाद कोयत्याने दोघांचा केला घात

पुणे – सार्वजनीक रस्त्यावर आडवे पाडून एकावर कोयत्याने डोक्यात आणी छातीवर सपासप वार करण्यात आले. ही घटना लोहियानगर येथी शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलासह चौघांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
एका 38 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार सलीम मुनीर शेख(46), अजिम सलीम शेख(21), अदनान सलीम शेख(20) यांना अटक करण्यात आली आहे. यातील अजिम शेख हा सराईत गुन्हेगार आहे. तर या घटनेत मुस्ताक शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार , फिर्यादी महिलेच्या मुलाची यातील अल्पवयीन मुलाबरोबर वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन फिर्यादीच्या पुतण्याच्या दुकानात सर्व आरोपी जाब विचारण्यास आले. तेथे त्यांच्या पुतण्याला शिवगाळ करण्यात येत होती. यावेळी फिर्यादीचा पती मुस्ताक शेख हा तेथे दाखल झाला. त्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वार त्याने हातावर घेतला.
यानंतर मुस्ताकला रस्त्यावर आडवे पाडून कोयत्याने डोक्यावर आणी छातीवर सपासप वार केले. इतर आरोपींनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली.
फिर्यादीचा पुतण्या मोईसच्याही हातावर आणी कमरेवर कोयत्याने वार करण्यात आले. मोईसचा मित्र अल्पेश हा भांडणे सोडविण्याकरीता आला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक माने करत आहेत. यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले, लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. घटनेनंतर तीघा आरोपींना अटक केली आहे.




