Sanjay Raut : ‘पुढचा बॉम्ब टाकल्यावर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल’; संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
Sanjay Raut : माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच लवकरच आपण हा बॉम्ब टाकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. “मी जेव्हा पुढचा बॉम्ब टाकेल, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल,” असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच लवकरच आपण हा बॉम्ब टाकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एसआरए घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कथित घोटाळ्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून आपल्या मर्जीतील बिल्डरांना वाचवले जात असल्यामुळेच या प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबई महापालिका ही देशातील सर्वात महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना बिल्डरांकडून त्यांच्या कार्यालयाचा दबाव आणला जात असल्याचे कळवले आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
३०० प्रकल्पांमध्ये ४० हजार कोटींचा घोटाळा? (Sanjay Raut)
मुंबईतील अनेक पॉश भागांमध्ये झोपडपट्ट्या नसतानाही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दाखवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अशा प्रकारचे तब्बल ३०० प्रकल्प असून, यामध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. दहशतीचे वातावरण निर्माण करून एसआरएतील अधिकाऱ्यांना विकत घेऊन हे सर्व सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा विषय अद्याप संपलेला नसून, याबाबत आणखी मोठे खुलासे करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
‘नैतिकता असती तर ३०० प्रकल्पांना स्थगिती दिली असती’ (Sanjay Raut)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, नैतिकदृष्ट्या प्रगल्भ मुख्यमंत्री असते, तर त्यांनी या ३०० प्रकल्पांना स्थगिती दिली असती. तसेच अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्यासही मुख्यमंत्री तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत यांनी खोचक शब्दांत टीका करत, “ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. जैसा नरेंद्र, वैसा देवेंद्र,” असे म्हटले.





