कॉंग्रेससमोर जागा राखण्याचे आव्हान

नांदेड उत्तर (86)

विभाजन आणि निर्मितीनंतर 2009 पासून नांदेड उत्तर हा मतदारसंघ कायमच कॉंग्रेसच्या मागे उभा आहे. 2014च्या कथित लाटेतही येथून अशोक चव्हाण यांचे मित्र तथा माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत निवडून आले. त्यावेळी येथून भाजप आणि एमआयएमने जबरदस्त मते मिळवत धक्‍का दिला. कदाचित युती झाली असती, तर हा निकाल वेगळा राहिला असता, पण अत्यंत थोड्या मतांनी कॉंग्रेसने ही जागा राखली. त्यामुळे यंदाची निवडणूक तशी सोपी राहिली नाही, याची जाणीव चव्हाणांना नक्‍कीच असेल.

नांदेड म्हणजे अशोक चव्हाण, या समीकरणाला लोकसभा निवडणुकीपासून छेद गेला आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीने दीड लाखांवर मते घेतली. ही झाली पार्श्‍वभूमी. यालाच जोडून विचार केल्यास नांदेड उत्तर मतदारसंघात मुस्लीम आणि मागासवर्गीय समाजाची मतदारसंख्या अधिक आहे. जिल्ह्यातील नऊपैकी गेल्या वेळी शिवसेनेचे सर्वाधिक चार, तर कॉंग्रेसचे तीन आमदार निवडून आले होते.

भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता. पण, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांनी बाजी मारली. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसने तीनचतुर्थांश जागा पटकावल्या होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेस अर्थातच अशोक चव्हाण यांनी बाजी मारली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत कॉंग्रेस विरुद्ध सारे एकत्र अशी लढत होऊनही कॉंग्रेसच्या अमर राजूरकर यांनी विजय संपादन केला होता. पण, आता लोकसभा निवडणुकीत सारेच चित्र बदलले. शिवसेनेचे तेव्हा आमदार असलेल्या प्रताप चिखलीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा लढविली. वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या सुमारे दीड लाख मतांमुळे अशोक चव्हाणांना पराभव स्वीकारावा लागला. नांदेडमधील विजयाने भाजप आणि शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघ आपल्यासाठी सोडून घेण्यावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येतो आणि जातीय गणितांच्या आधारे कोणाला उमेदवारी दिली जाते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे आव्हान
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा कॉंग्रेस व राष्ट्रवादीला ज्या मतदारसंघांमध्ये फटका बसला, त्यात नांदेडचा समावेश होता. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करून निवडणुकीची तयारी स्वतंत्रपणे सुरू असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसमोर वंचित बहुजन आघाडीचे आव्हान कायम आहे. तर, आता एमआयएम आणि वंचित आघाडी स्वतंत्र लढणार असल्याने कॉंग्रेसला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×