टोमॅटोच्या कडाडलेल्या किंमतीवर अखेर केंद्र सरकारला आली जाग ! घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली – देशभरात टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर त्याबाबत केंद्र सरकारला आता उशिरा का होईना जाग आली असून आता केंद्र सरकारने आपल्या नाफेड आणि एनसीसीएफ एजन्सींना प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांतील मंडईंमधून ताबडतोब टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा राज्यांतून हे टोमॅटो खरेदी केले जाणार असून ते अन्य राज्यांत पुरवले जाणार आहेत.
टोमॅटोच्या किमतीतील वाढ ही केवळ एका विशिष्ट प्रदेशापुरती किंवा भागापुरती मर्यादित नसून संपूर्ण देशभरात नोंदवली गेली आहे. प्रमुख शहरांमध्ये हे भाव 150-160 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले.दर वर्षी जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालखंड टोमॅटोसाठी कमी उत्पादनाचे महिने असतात असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या आठवड्यात, शुक्रवारपर्यंत टोमॅटोचा साठा किरकोळ दुकानांद्वारे दिल्ली एनसीआर क्षेत्रातील ग्राहकांना सवलतीच्या दरात वितरित केला जाईल, असे अन्न मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे.
ज्या भागामध्ये प्रचलित किंमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशी शहरे ओळखली गेली गेली असून तिथे या टोमॅटोचे रास्त दरात वितरण केले जाणार आहे. टोमॅटोचे उत्पादन भारतातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये होते, पण त्याचे उत्पादन हंगामावर अवलंबून आहे. या पीक कापणीचा हंगाम डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान येतो. सामान्य किंमतींच्या हंगामाव्यतिरिक्त, तात्पुरत्या पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान इत्यादींमुळे अनेकदा किमती अचानक वाढतात. सरकारने किमती वाढण्याचे कारण मान्सून असे दिले आहे. टोमॅटोचे शेल्फ लाइफ तुलनेने कमी असते. तशातच पावसाने या पिकांचे नुकसान झाले असून त्याच्या वाहतुकीतही अडथळे आल्याने काहीं ठिकाणी भाववाढ झाली आहे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सध्या, गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमधील बाजारपेठेत येणारा टोमॅटोचा पुरवठा बहुतांशी महाराष्ट्रातून विशेषत: सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून होतो, जो या महिन्याच्या शेवटपर्यंत टिकून राहण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशातील मदनपल्ले (चित्तूर) येथेही वाजवी प्रमाणात आवक सुरू आहे. दिल्ली एनसीआरमध्ये येणारी आवक प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून आणि काही प्रमाणात कर्नाटकातील कोलारमधून येते.
नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पिकांची आवक अपेक्षित आहे. शिवाय, ऑगस्टमध्ये नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून अतिरिक्त पुरवठा होणे अपेक्षित आहे. मध्य प्रदेशातही आवक सुरू होण्याची शक्यता आहे. नजीकच्या भविष्यात किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे,असे अन्न मंत्रालयाने ठामपणे सांगितले.





