संसद सुरक्षा भेदल्याचे प्रकरण ! ललित झा नव्हे; मनोरंजन मास्टरमाइंड?

नवी दिल्ली -संसद सुरक्षा भेदण्यात आल्याच्या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून ललित झा याच्याकडे पाहिले जात आहे. मात्र, ललित नव्हे; तर मनोरंजन डी. हा मास्टरमाइंड असावा, असा दिल्ली पोलिसांचा संशय बळावला आहे.
संसदेची सुरक्षा भेदण्याची घटना १३ डिसेंबरला घडली. त्या प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये समावेश असणाऱ्या मनोरंजन आणि सागर शर्मा यांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या घेतल्या होत्या. त्या प्रकरणाचा तपास करत असणाऱ्या पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ललितकडे केवळ पुरावे उद्धवस्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केंद्र सरकारला संदेश देण्यासाठी काहीतरी मोठे करण्याच्या उद्देशातून सुरक्षाभंग घडवण्यात आला. त्यासाठी मनोरंजन याने इतरांना प्रवृत्त केले, असे ललितने चौकशीवेळी सांगितल्याचे त्या सुत्रांनी नमूद केले.
मनोरंजन हा कर्नाटकमधील म्हैसूरचा रहिवासी आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी त्याने इंजिनियरींगचे शिक्षण सोडले. बेरोजगार असूनही तो कंबोडियाला जाऊन आला. त्या घडामोडीकडे तपास यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी याआधी चौकशीवेळी बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि मणिपूर हिंसाचारामुळे अस्वस्थ असल्याचे सांगितले. आता सर्व आरोपींची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सायको-ॲनालिसिस चाचणी केली जात आहे. त्या चाचणीनुसार डॉक्टर आरोपींची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींनी संबंधित कृत्य का केले याचे नेमके कारण अद्याप सांगितले नसल्याचे पोलिसांना वाटते.





