हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद जीवावर बेतला; मजुराला पायाखाली चिरडून केलं ठार

गडचिरोली – आपण दररोज किती तरी सेल्फी काढतो. कित्येक लोक प्राण्यांसोबत आपले सेल्फी काढतात. हत्तीसारखे प्राणी जे आपल्याला कधीतरी पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.
हत्ती शरीराने अवाढव्य असला तरी इतर जंगली प्राण्यांप्रमाणे त्याची तितकी भीती वाटत नाही. म्हणून काही लोक बिनधास्त त्याच्याजवळ जातात. अशीच एक व्यक्ती हत्तीसोबत सेल्फी काढायला गेली आणि जीव गमावून बसली.
गडचिरोलीतील ही धक्कादायक घटना. हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जीवावर बेतला आहे. हत्तीने मजुराला पायाखाली चिरडून जागीच ठार केलं आहे. चामोर्शी तालुक्याच्या आबापूर जंगलात घडलेली ही घटना.
श्रीकांत रामचंद्र सतरे असं या मृत मजुराचं नाव आहे. मूळचा चंद्रपूरचा असलेला श्रीकांत गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचं काम करण्यासाठी आला होता. गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच हे काम सुरू होते.
२३ ऑक्टोबर रोजी चातगाव आणि गडचिरोली वन परिक्षेत्रातून जंगली हत्ती कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केला होता. आबापूर जंगलात हा हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली. त्यापैकी तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते.
हत्ती दूरवरच असताना श्रीकांत हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न होता. तेव्हाच हत्तीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला पायाखाली चिरडले. तोपर्यंत इतर दोघंजण तिथून पळाले. त्यामुळे ते आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले.
छत्तीसगडमधून तो दुसऱ्यांदा गडचिरोलीत आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना सावध केले असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.





