Rajgad Fort : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू, १९ जण जखमी
Rajgad Fort :

Rajgad Fort : राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून आलेल्या एका खासगी कंपनीच्या २२ कर्मचाऱ्यांवर रविवारी पहाटे काळाने घाला घातला.
पाबे घाटातून राजगडकडे जात असताना पाबे गावाजवळील शेवटच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बसने सुरक्षा भिंतीचा कठडा तोडून सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळत पलटी घेतली. या भीषण अपघातात चालकासह तिघांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खासगी कंपनीचे २२ कर्मचारी पहाटे दोनच्या सुमारास राजगड पर्यटनासाठी निघाले होते. पाबे गावाजवळील घाटातील शेवटच्या वळणावर बस चालक संदीप तुकाराम गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बसने रस्त्यालगतचा सुरक्षा कठडा तोडत थेट दरीत झेप घेतली.
तीन जणांचा मृत्यू
अपघातात चालक संदीप तुकाराम गायकवाड हे बसखाली दबले गेले. तसेच विश्वास बाबुराव सतीम (वय २५) यांचा बसखाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. चालकाच्या मागील सीटवर बसलेली ध्वनी चंद्रेश ठक्कर (वय २३) ही दोन सीटच्या मध्ये अडकल्याने तिचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनचे निलेश राणे यांनी वेल्हे पोलीस स्टेशन तसेच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला तातडीने कळविले. त्यानंतर वेल्हे पोलीस स्टेशनचे आकाश पाटील, पंकज मोघे व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमने अत्याधुनिक साहित्यांसह घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांनीही या मोहिमेत मोलाची मदत केली.
चालक बसखाली गंभीररीत्या अडकला
दरीत कोसळलेली बस झाडाला अडकून राहिल्याने चालक बसखाली गंभीररीत्या अडकला होता. त्याच्या अंगावर डिझेल सांडलेले होते. तसेच वाहनाचे विद्युत सर्किट सुरू असल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमने जेसीबी मशीन व रोपच्या साहाय्याने बस स्थिर केली.
त्यानंतर रेस्क्यू टीमच्या एका सदस्याने बसमध्ये प्रवेश करून सीटचे लोखंडी भाग व कुशन कापून चालकाचा अडकलेला पाय मोकळा केला. तसेच त्याच्या खालील माती उकरून जागा निर्माण केल्याने चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. Rajgad Fort
अपघातातील सर्व जखमींना तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. भुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. मृत झालेल्या विश्वास सतीम आणि ध्वनी ठक्कर यांच्या मृतदेहांवर पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी वेल्हे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
या भीषण दुर्घटनेमुळे राजगड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीम, पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणखी मोठी जीवितहानी टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
हेही वाचा:
Huma Qureshi : “चांगली गाणी खराब करण्याची सवय”; हुमा कुरेशी ‘इश्क कमीना’च्या रिमेकमुळे ट्रोल





