“‘त्यांच्या’ पापाचा घडा भरला होता, आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळाला”

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्यानंतर आमदार रवी राणा यांनी पांडे यांच्या पापचा घडा भरला होता अशी टीका केली आहे.
रवी राणा यांनी हनुमान चालीसा प्रकरणात आपल्याविरोधात गुन्हा दाखल करणारे पोलीस आयुक्त पांडेच होते असा आरोप त्यांनी केला. तसेच पुढे बोलताना,“संजय पांडे यांना अटक झाली आहे. त्यांना ईडीच्या माध्यमातून अवैध संपत्ती, अवैध मालमत्ता, अवैध बॅक बॅलेन्स या सगळ्याची चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचा असून म्हटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या सांगण्यावरुन आमच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला,” असे रवी राणा यांनी म्हटले आहे.
“खासदार नवनीत राणा आणि मला दोन दिवस लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. १२ दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. लॉकअपमध्ये आम्हाला पाणी प्यायला दिलं नव्हतं, बसायला साधी चटईही दिली नाही. आमच्या घरात पोलीस घुसवून आम्हाला अटक केली. ३५३ सारखा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल केला. आम्हाला जबरदस्तीने अटक करुन पोलीस स्थानकामध्ये अनेक तास बसवून ठेवण्यात आले. या सगळ्यामुळे संजय पांडेंचा पापाचा घडा भरला होता. आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे,” असे रवी राणा म्हणाले आहेत.
“ज्या पद्धतीने अनिल परब आणि ईडीची चौकशी सुरु आहे ते पाहता येणाऱ्या काळात अनिल परब सुद्धा तुरुंगात जातील. संजय राऊत सुद्धा तुरुंगात जातील,” असा दावा रवी राणांना केला आहे.





