पिंपरी | पोश्री नदीवरील पुलाला भगदाड

कर्जत, {विजय डेरवणकर} : कर्जत-मुरबाड महामार्गावरील कळंब गावाजवळ पोश्री नदीवरील पुलाला अतिवृष्टीमुळे भगदाड पडले असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. भगदाड पडलेल्या भागात बॅरिकेट लावण्यात आले असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.
मात्र सततच्या पावसाने आणि अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने पुलाचा खचलेला भाग कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या हा पूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी होत आहे.
वाहन चालकामुळे अनर्थ टळला –
शनिवारी सायंकाळच्या सुमारास एका वाहन चालकाला पुलाजवळ रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्याचे दिसले. त्याने तपासून पाहिले असता, पुलाच्या एका बाजूचा मातीचा भराव वाहून तिथे मोठे भगदाड पडल्याचे त्याच्या लक्षात आले. वाहन चालकाने तत्काळ स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी खचलेल्या भागाच्या दुतर्फा तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट्स लावले असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.
पुलाचे बांधकाम ८० वर्षे जुणे –
पोश्री नदीवरील हा पूल सुमारे ७० ते ८० वर्षे जुना आहे. यापूर्वी अनेकदा पुलाची डागडुजी करण्यात आली. मात्र, बांधकाम अतिशय जुने असल्याने पूल जीर्ण होत चालला आहे. तसेच पुलाचे स्लॅब खालच्या भागात अनेक ठिकाणी निखळले असून गंजलेल्या लोखंडी सळया उघड्या पडलेल्या आहेत.
वृक्ष वेलींच्या विळख्याने पुलाचे बांधकाम दिवसेगणिक कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या पुलाची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी ग्रामस्थ, वाहनचालक करत आहे.
संपर्क तुटण्याची भीती –
मागील आठवड्याभरापासून परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कर्जत-मुरबाड हायवेवरील पोश्री नदीवरूल हा पूल खचल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
परंतू दुसरीकडे या पुलावरील वाहतूक बंद केल्यास ठाणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा एक दुवा नाहीसा होऊ शकतो, त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना याचा फटका बसू शकतो.
कर्जत-मुरबाड महामार्गावर असलेल्या पोश्री नदीवरील पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. सततच्या पावसामुळे पुलाचे भगदाड आणखीन मोठे होत असून पुलाच्या एक बाजूचा भराव वाहून गेला आहे.
पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र अवजड वाहनांच्या भाराने पुलाचा कळंब बाजूचा भाग पूर्णपणे कोसळून अपघात होऊ शकतो. प्रशासनाने ताबडतोब यावर उपाययोजना करावी. – दीपक म्हसे, ग्रामस्थ, खैरपाडा-कळंब
कळंब जवळ पोश्री नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने येथे पाहणी करून उपाययोजना कराव्यात. – विनोद भोईर, ग्रामस्थ, वारे





