‘नरकातील राऊत’ असे पुस्तकाचे नाव योग्य राहील: मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule : खासदार संजय राऊत त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. आज सायंकाळी ६ वाजता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पार पडणार आहे. राऊतांनी या पुस्तकातून अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. यानंतर त्यांना १०० दिवसांचा तुरुंगवास भोगवा लागला होता. याचे अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. तसेच अनेक राजकीय खळबळजनक दावे देखील त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहेत.
या पुस्तकात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी संकटकाळी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कशाप्रकारे मदत केली. याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव बदलून ते ‘नरकातला राऊत’ असे ठेवण्यात यावे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच पुस्तकात नैतिक दिवाळखोरी असल्याची टीका देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
भाजप-सेना युती राज्यात सर्वोत्तम होती. या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचे काम केले होते. मात्र, संजय राऊत सारख्या व्यक्तीने शिवसेनेला संपविले. हिंदुत्व विचारापासून फारकत घेत काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याच काम त्यांनी केले, असे देखील बावनकुळे म्हणाले. तसेच गोधरा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ‘क्लीन चिट’ दिली असल्याचे बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.
पुस्तकाची चौकशी व्हावी
या पुस्तकात न्यायालयाच्या विरोधात असलेल्या मजकुराचा तपास व्हायला हवा. पुस्तकात आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम केले गेले आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला. त्यामुळे या पुस्तकातील लिखाणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





