मॉस्को – गेल्या साधारण वर्षभरापासून गायब असलेली रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना थेट मनोरूग्ण म्हटल्यामुळे ती गेल्या वर्षी प्रसिध्दीच्या झोतात आली होती. मात्र त्यानंतर ग्रेटा वेडलर बेपत्ता झाली होती.
ग्रेटाची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविन याने केली आहे, असे एका विदेशी वाहिनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबत तिची हत्या केली व तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून कारच्या ट्रंकेत ठेवला. धक्कादायक म्हणजे कोरोविन तीन रात्र ग्रेटाच्या मृतदेहासोबत हॉटेलच्या खोलीत झोपला होता.
ग्रेटाचा खून झाला असल्याचे किंवा ती गायब असल्याचे कोणाला कळू नये यासाठी तो तिचे सोशल मीडिया पेज अपडेट करत होता. कोरोविनने हत्येची कबूली दिल्यानंतर ही हत्या राजकीय वादातून नाही तर पैशाच्या वादातून झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ग्रेटा वेडलरचा मृतदेह सापडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ग्रेटाची हत्या राजकीय वादातून तर झाली नाही ना?, असा प्रश्न अनेकांना पडला असताना ग्रेटाच्या एक्स बॉयफ्रेंडने हत्येचा गुन्हा कबूल केला आहे.