नेपाळ विमान अपघातातील सर्वांचे मृतदेह काठमांडूला

काठमांडू – नेपाळ विमान अपघातात मरण पावलेल्या सर्व म्हणजे 22 प्रवाशांचे मृतदेह राजधानी काठमांडूला आणण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील चौघांचा समावेश आहे. आता या सर्वांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
विमान कंपनीचे “9एन-एईटी’ विमान दोन दिवसांपूर्वी पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर अल्पावधीतच कोसळले होते. त्यामध्ये 4 भारतीय, 2 जर्मन आणि 13 नेपाळी प्रवासी होते. विमानात 3 नेपाळी कर्मचारीही होते. काल घटनास्थळावरून 21 मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते. तर एक मृतदेह आज सापडला.
हे सर्व मृतदेह नेपाळ लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्रिभुवन विमानतळावर आणण्यात आले, असे विमानतळाचे महाव्यवस्थापक प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.
या विमान अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी सरकारने 5 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार खराब हवामानानुसार हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. अपघात झालेल्या ठिकाणाजवळून विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून काठमांडूला तज्ज्ञांच्या हवाली तो केला जाणार आहे.





