Ram Chandra Poudel : नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांची प्रकृती बिघडली

काठमांडू : नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पौडेल यांचे वय ८० वर्षे असून त्यांना काठमांडूतील मनमोहन कार्डिओथोरॅसिक ऍन्ड ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे अध्य७ंच्या कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. अध्यक्ष पौडेल यांना डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले.
डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि आतापर्यंत त्यांची प्कृती सामान्य आहे, असे रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. शनिवारी सकाळी अध्यक्ष पौडेल जेन-झी गटाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार होते, त्यांच्यापैकी सुमारे २० जण आधीच चर्चेसाठी अध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचले होते. तथापि, पौडेल यांची प्रकृती बिघडल्यानंतर ही चर्चा सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
आंदोलकांवर बळाची कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जेन- झी चे कार्यकर्ते अध्यक्षांना देणार होते. २०२३ मध्ये, पौडेल यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारांसाठी विमानाने भारतात नवी दिल्लीतील एम्स येथे आणण्यात आले होते.




