औद्योगिक वसाहतीत स्फोट सत्र सुरूच

दौंड – तालुक्यातील कुरकुंभ येथे औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीतील जवळपास सर्वच कंपन्या या केमिकल कंपन्या आहेत. वास्तविक केमिकल कंपन्यांसाठी असणारी औद्योगिक वसाहत ही समुद्रसपाटीपासून खालच्या अंतरावर उभारली जाते. मात्र दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही त्याला अपवाद आहे.
या ठिकाणी केमिकल झोनच्या कंपन्या आल्या असून, केमिकल झोनला परवानगी देण्यात आलेली आहे. हा केमिकल झोन समुद्रसपाटीपासून उंचीवर आहे, याचा परिणाम हवेत मिसळणारे वायू, तसेच कारखान्यातून सोडणाऱ्या सांडपाण्यातून वाहत जाणारा ओढ्या नाल्याद्वारे नदीत होत असतो. एवढी गंभीर बाब असतानाही त्यावेळी या केमिकल झोनला कोणी परवानगी दिली, असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स या कंपनीला 14 ऑगस्टला भीषण आग लागली होती. या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही; यामुळे संपूर्ण पंधरा ते वीस किलोमीटर परिसराला धोका असल्याची चर्चा त्या दिवशी सुरू होती. लोक घरदार सोडून पळत होते. या आगीत कंपनीचे नुकसान झाले खरे मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. त्यानंतर 21 ऑक्टोबरलाही रात्री येथील इटरनेस कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये देखील जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनांमुळे परिसरात भीती आहे. या घटनांव्यतिरिक्त या औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये छोटे-मोठे स्फोट होऊन काहींना प्राण गमवावे लागले, तर अनेकांना अपंगत्व आले आहे.
सतत होणाऱ्या अपघातांमधून केमिकल कंपन्यांनी बोध घेऊन हे अपघात थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. कंपन्यांमधील स्फोटांमुळे या परिसरातील नागरिकांनाही आता या कंपन्यांचा धोका वाटू लागला आहे, त्यामुळे प्रशासनाने यावर परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना या कंपन्यांबाबत माहिती देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, तसेच पुढील काळात अशा घटना घडू नयेत, म्हणून ठोस उपायोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





