वॉशिंग्टन -कोणताही संघर्ष किंवा विरोध न होता काबूल तालिबान्यांच्या हातात पडणे हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा पराभव आहे, अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानात जे केले आहे ते अभूतपूर्व आहे. अमेरिकेच्या इतिहासातला सर्वांत मोठा पराभव तेथे झाला आहे.
काबूल तालिबान्यांच्या हातात पडल्याची घोषणा झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही टीका केली आहे. दरम्यान व्हाइट हाउस किंवा बायडेन यांच्याकडून याविषयी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. पण ट्रम्प यांनी मात्र बायडेन यांच्यावर टीका करण्याची संधी यानिमीत्ताने साधली आहे.
अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांतील माजी राजदूत निक्की हॅले यांनीही हे बायडेन प्रशासनाचे अपयश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही एखादी गोष्ट कशी करता ही बाब महत्त्वाची आहे.
अमेरिकन सैनिकांना व कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानच्या बाहेर सुरक्षितपणे जाऊ द्या, अशी भीक तालिबान्यांकडे मागण्याची वेळ अमेरिकेवर आली आहे. आता आपल्यापुढे याहीपेक्षा मोठी धोकादायक स्थिती उद्भवणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
माईक पॉम्पेओ यांनी म्हटले आहे की, आज जर ट्रम्प अध्यक्ष असते तर तालिबान्यांनी असे धाडस केले नसते कारण त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल याची जाणीव तालिबान्यांना आहे. कासीम सोलेमनी यांनी तो धडा घेतला आहे. दरम्यान अमेरिकेचे विदेश मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे की अमेरिकेने तालिबानकडे कसलीही मागणी केलेली नाही.
उलट आम्ही परत जात असताना जर आमच्या कोणत्याही नागरिकांवर हल्ला झाला किंवा आमच्या प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप झाला तर त्यावर त्वरेने निर्णायक कारवाई केली जाईल, असा इशारा आम्ही तालिबानला दिला आहे, असे टोनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. ब्लिंकेन यांनी अध्यक्ष बायडेन यांच्या अफगाणिस्तान धोरणाचे समर्थनच केले आहे.