प्रभात वृत्तसेवा पुणे – ‘भीमथडी’ जत्रेतील एका स्टाॅलमधून ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिला मूळच्या इंदापूरमधील बेलवडी-थोरातवाडी गावातील रहिवासी आहे. महिला आणि गावातील बचत गटातील महिलांनी कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘भीमथडी’ जत्रेत खाद्यपदार्थांचा स्टाॅल लावला आहे. गुरुवारी (२५ डिसेंबर) नाताळची सुटी असल्याने ‘भीमथडी’ जत्रेत गर्दी झाली होती. खाद्यपदार्थ विक्रीतून जमा झालेली रोकड महिलेने स्टाॅलमधील स्टिलच्या डब्यात ठेवली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चोरट्यांनी स्टिलच्या डब्यात ठेवलेली ५५ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.