पुणे जिल्हा | विद्युत रोषणाईने खुलले डिंभे धरणाचे सौंदर्य

मंचर, (प्रतिनिधी) – जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण येथे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर आहुपे, कोंढवळ, पोखरी घाट, बोरघर इत्यादी भागातील विविध गावात सर्वदूर पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच 100 टक्के भरले आहे.
सध्या धरण 100 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, सांडव्यावर जलसंपदा विभागाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत तिरंगा झेंड्यासारखी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये हर घर तिरंगा हा कार्यक्रम देशभरात साजरा केला जात आहे.
भारतीय जनतेमध्ये व विशेषतः नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी हा उद्देश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या वतीने देखील केली आहे.
त्याच अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण येथे पाणी पडणार्या सांडव्यावर आणि धरणाच्या भिंतीवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिकारी दत्ता कोकणे यांनी सांगितले.





