वेध : बलुचिस्तानात पुन्हा संघर्ष भडकणार…

बलुचिस्तानच्या तुर्बन भागातील पाकच्या सैन्य ठिकाणावर केलेल्या हल्ल्यात 130 जवान ठार केल्याचे बलुचिस्तान लिब्रेशन फ्रंटने म्हटले. चिनी नागरिकांना बलुचिस्तान सोडून जाण्यासही सांगितले आहे.
बलुचिस्तान इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्यात विभागला गेला असून मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तर काही भाग इराण व अफगाणिस्तानमध्ये विभागला आहे. सद्यस्थितीतील बलुचिस्तान हा पाकचा पश्चिम भाग असून त्याच्या पश्चिमेला इराण, वायव्यला अफगाणिस्तान, ईशान्येला खैबर पख्खतून, पूर्वेला पाकिस्तानातील पंजाब, आग्नेयला सिंध प्रांत, तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे. बलुचिस्तान हा पाकचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा पण कमी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 13,4051 चौरस मैल असून बहुसंख्य लोकसंख्या बलोच आहे. त्यानंतर पश्तुन, ब्राहुई, हजारास, सिंधी, पंजाबी, मिर्री आहेत. येथे मुख्यत्वे बालोची, उर्दू, पश्तो व ब्राहूई भाषा बोलली जाते. बलुचिस्तानमधून पाकिस्तानला नैसर्गिक गॅस व तेल मिळते तसेच कोळसा, सोने, तांबे, युरेनियम आदी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बरीचशी मदत होते. मात्र यातून बलुचिस्तानला काहीही मिळत नाही.
भारताच्या फाळणीपूर्वी बलुचिस्तानच्या ठिकाणी कलात, मकरान, खरान, लासबुल्ला ही संस्थाने होती. यात कलात या संस्थानाशी इंग्रजांनी 1876 मध्ये केलेल्या करारानुसार कलातला आंतरिक स्वतंत्रता दिली होती. म्हणजे कोणात विलीन व्हावयाचे अथवा स्वतंत्र राहायचे हे ठरविण्याचा अधिकार कलातला होता. इंग्रजांनी कलातला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला होता. 4 ऑगस्ट 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन, कलातचे खान मीर अहमद खान, बॅरिस्टर जिना व जवाहरलाल नेहरू यांची दिल्लीत एक बैठक झाली,.कलातची बाजू मांडण्याची वकिली जिना यांनी केली. 5 ऑगस्टला कलातला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय बैठकीत झाला. मात्र मकरान, खरान, लासबुल्ला यांना कलातमध्ये विलीन होण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे मुस्लीम लीग कलातला एका स्वतंत्र राज्याच्या रूपात मान्यता देईल व त्याचा सन्मान करेल, असाही एक ठराव कलात व मुस्लीम लीगमधे झाला. 11 ऑगस्टला कलात स्वतंत्र झाले व 15 ऑगस्ट 1947 रोजी कलातने आपला स्वातंत्र्य दिवस साजरा केला.
ऑक्टोबर 1947 मध्ये कलातच्या खानने पाकिस्तानला भेट दिली. त्यावेळेस तेथील बलूच जनतेने त्याचे राजेशाही स्वागत केले. मात्र जिनांनी खान यांना कलातला पाकमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला. खान यांनी ही बाब स्पष्टपणे फेटाळली. एवढेच नव्हे तर जनतेचाही या संभाव्य विलयाला विरोध होता. तेव्हा जिना यांनी 18 मार्च 1948 रोजी खरान, लासबुल्ला व मकरान यांना कलातपासून वेगळे केल्याची घोषणा केली व 27 मार्च 1948 रोजी कलातवर हल्ला करून खानकडून विलीनकरणाच्या करारावर सह्या घेतल्या.या विलीनकरणाविरुद्ध बलुचिस्तानमध्ये पाक विरुद्ध असंतोष उफाळला व गेल्या 75 वर्षांपासून याविरुद्ध बलुचिस्तान सतत संघर्ष करीत आहे. कलातच्या खानचे बंधू अब्दुल करीम यांनी बंडाचे निशाण उभारले, त्यांना कैद करण्यात आले.
1958 मध्ये झालावनचे नबाब नौरोज खान यांनी पाकच्या धोरणाविरुद्ध लढा दिला. मात्र त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून कैदेत टाकण्यात आले. त्यांचा कैदेतच मृत्यू झाला. 1960 मध्ये शेख मुहम्मद बीजराणी मर्री यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला. मात्र 1969 मध्ये तो दडपण्यात आला. 1973 मध्ये पाकने बलुचिस्तानचे प्रांतीय सरकार बरखास्त करून मार्शल लॉ लागू केला. त्यामुळे सशस्त्र विद्रोह सुरू झाला. मीर जाफरखान यांनी ‘बलुच पीपल लिबरेशन फ्रंट’ची स्थापना केली. यात मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या मर्री व मेंगल आदिवासींनी संघर्ष केला. हा शमवण्यासाठी इराणच्या मदतीने त्या भागात बॉम्ब वर्षाव करण्यात आला. त्यात अंदाजे 7 ते 8 हजार बलुच आंदोलक व नागरिक मरण पावले, तर जवळपास 3 हजारच्या आसपास पाक सैनिक ठार झाल्याचा दावा केला होता. मात्र बंडावर काबू मिळविण्यात आला. 2005 मध्ये नबाब अकबर खान बुग्ती व मीर बालाच मुर्री यांचे नेतृत्वात बलुचिस्तानला अधिक स्वायत्तता मिळावी व येथील सैन्यतळ हटविण्याच्या मागणीसाठी संघर्ष करण्यात आला. अकबर खान बुग्ती हे बलुचचे मोठे नेते असून पाकच्या मंत्रिमंडळात मंत्री होते तसेच बलुचचे भूतपूर्व गव्हर्नरही होते. मात्र त्यांना ठार करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत अनेक विरोधी नेते व आंदोलन करणार्या व्यक्ती बेपत्ता आहेत. पाक शासनाने त्यांना पकडून त्यांची हत्या केल्याचा आरोप बलुच जनतेचा आहे.
दरम्यान पाकिस्तानी ग्वादर बंदर विकसित करण्यासाठी चीनने भरपूर गुंतवणूक केली व त्या विकासाची कामे अद्यापही सुरू आहेत. या विकासाच्या निमित्ताने चिनी तंत्रज्ञ व कामगार या भागात येऊन राहू लागले. चीनने या बंदरातून मासेमार्यांना हाकलून दिले. याचाही बलुच जनतेवर परिणाम झाला. त्यांचा या सर्व बाबीला विरोध आहे. या परकियांच्या येण्यामुळे आपण आपल्याच भागात अल्पसंख्याक होऊ ही भीती त्यांना अस्वस्थ करते. जमीन आपली परंतु फायदा इतरांचा हे बलुचला मान्य नाही. त्यामुळे सतत असंतोष खदखदत असतो. (यातूनच काही वर्षांपूर्वी उद्भवलेल्या उद्रेकात तीन चिनी अभियंत्यांची हत्या झाली होती) त्यामुळे बलुचियन लिबरेशन आर्मीने चिनी नागरिकांना 90 दिवसांत पाक सोडून जाण्याचे अन्यथा मृत्यूला सामोरे जाण्याचे फर्मान काढले आहे. त्यासाठी बीएलएने एक संघटनही स्थापन केले आहे.
बलुच विद्रोह मोडून काढण्यासाठी पाक सैन्याने मध्यंतरी ‘आजम-ए-ईत्तेखाम’ नावाचे ऑपरेशन चालविले होते, परंतु त्यामुळे बलुच विद्रोह अधिकच भडकला व सैन्यावरील हल्ल्याची तीव्रता वाढली यातूनच गेल्या आठ दिवसांपूर्वी तुर्बत भागात सैन्याच्या एका छावणीवर हल्ला करून 130 सैनिक ठार केल्याचा दावा बीएलएने केला आहे. या हल्ल्यात बीएलए, बलुच लिबरेशन फ्रंट, तहरीक ए तालिबान आदी संघटना एकत्रित सहकार्य करीत असल्याचा दावा आहे. साहजिकच पाक सरकार चिनी पाहुण्यांच्या रक्षणाची जबाबदारी शिरावर घेणार व त्यातून पुन्हा एकदा बलुच विद्रोही व पाक सेनेत संघर्षाचा भडका उडणार याची चिन्हे दिसत आहेत.





