औटींनी मौन सोडले; उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार

पारनेर – विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार विजय औटी यांनी अखेर मौन सोडले. पारनेर येथे शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते यांचा मोबाईलद्वारे संवाद घडवून आणला. यावेळी आम्ही तुमच्याचबरोबर आहोत,अशी ग्वाही औटी यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील शिवसेना सध्या तरी ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेनेमध्ये फूट पाडल्याने सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे कोण व ठाकरे गटाकडे कोण याची चर्चा सुरू झाली. यातून शिवसेना पक्षप्रमुख राज्यात प्रत्येक शहरासह गावातील शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. पारनेर येथे औटी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शिवसेनेचे शाखा, गट व विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत औटी यांनी मोबाईलद्वारे थेट मातोश्रीवर संपर्क करून ठाकरे व उपस्थित शिवसैनिक यांच्यात संवाद घडून आणला. यावेळी ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, सध्या काळ कठीण आहे, तुमची मला साथ हवी आहे. मला तुमची गरज आहे.
यापुढील निवडणुका आपणाला सर्व ताकदीनिशी लढावयाच्या आहेत, असे सांगत धनुष्यबाण आपलाच आहे व आपलाच राहील. असे सांगत भावनिक साद घातली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. यावेळी सर्वांनी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, अशी ग्वाही दिली. तालुक्यातील शिवसेना तरी निश्चितच ठाकरे यांच्या पाठीशी अभेद्यपणे उभी आहे. याची जाणीव कालच्या मेळाव्यातून झाली. औटी तालुक्यातून तीन वेळा आमदार म्हणून विधानसभेवर गेले होते. इतकेच नव्हे तर शेवटच्या टप्प्यात त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष पद ही भूषवले.
एक अभ्यासू व हुशार राजकारणी नेते म्हणून औटी यांच्याकडे पाहिले जाते. ते शिवसेनेतील एक वजनदार नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचा एक गट वेगळा केल्यानंतर व शिवसेनेत फूट पडल्यानंतर तालुक्यात औटी हे काय भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले होते. मात्र नुकत्याच झालेल्या मेळाव्यात औटी यांच्यासह सर्व कार्यकर्ते ठाकरे यांच्याच गटात राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र आगामी काळात येऊ घातलेल्या विविध निवडणुकांमध्ये औटी काय भूमिका घेतात, कोणाशी युती करतात, की स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार हे मात्र आत्ताच सांगता येत नाही. औटी यांची भूमिका आगामी काळात व राजकारणात निर्णायक ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या भूमिककडे तालुक्यातील राजकीय नेत्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे.





