नागपूर : नरखेड येथून प्रचारसभा आटपून काटोलकडे परतत असताना बेला फाट्याजवळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले. यावर आता ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निकम म्हणाले, निश्चितच अशा प्रकारचा हल्ला होणे हे दुर्दैव आहे. हा हल्ला कोणी केला? केव्हा झाला? कसा झाला? याबाबत पोलिस तपास चालू आहे. पोलिस तपासानंतर सत्य उघडकीस येईल. परंतु, तो तपास पूर्ण होण्याआधी जी काही पत्रकबाजी चालू आहे, ज्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत ते गैर आहे असे मला वाटते. तसेच हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा, अशी शंका देखील निकम यांनी उपस्थित केली आहे. पुढे बोलताना निकम म्हणाले, या हल्ल्यामागे काहीतरी व्यक्तीगत कारण असेल हे देखील नाकारता येत नाही. पोलिस तपासानंतर दूध का दूथ आणि पाणी का पाणी होईल. पोलिस तपास होईपर्यंत थोडी कळ सोसावी लागेल. परंतु, लोकसभेच्या मानाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात नेत्यांचे एकमेकांवरील हल्ले, प्रतिहल्ले, राजकीय स्टंटबाजी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणं कारणीभूत आहेत असे मला वाटते. प्रत्येक नेत्याने संयम ठेवायला हवा, असा सल्ला देखील निकम यांनी दिला आहे.