बाजार समिती निवडणुकीमुळे जावळीतील वातावरण तापले

कुडाळ – जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 27 मार्चपासून सुरू झाला असून लगेचच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील झाली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून या संस्थेवर आजपर्यंत तीन आमदारांचा वरदहस्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तीनही आमदार आपापल्या कार्यकर्त्यांची बाजार समितीवर वर्णी लावण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती जावळी तालुक्यातील राजकीयदृष्टया अत्यंत महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांचे अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाणारी जावळी कृषी उत्पन्न बाजार समिती ही स्ट्रॉबेरी पिकासाठी ही राज्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बाजार समितीने अन्य व्यापारही वाढविल्याने संस्थेचे उलाढाल ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
माजी चेअरमन राजेंद्र काका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात बाजार समितीने आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले पाहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर जावळीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र गेल्या पाच वर्षात तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदललेली आहेत, व तालुक्याचे नेतृत्व भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सक्षमरित्या करत आहेत. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जावळीकरांना संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ही बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने संस्थेत सत्तांतर करून ती भाजपाच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी निश्चित होणार असल्याचे राजकीय चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्हा बॅंकेतील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आमदार शिंदे यांच्या जिव्हारी लागल्याने त्याची सल आजही आमदार शिंदे यांच्या मनात असल्याने त्याचा परिणाम ही येऊ घातलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाबळेश्वर तालुक्याचे नेतृत्व आमदार मकरंद पाटील यांच्याकडे आहे जावळी बाजार समिती ही महाबळेश्वरशी संलग्न असल्याने आमदार मकरंद पाटील यांची भूमिका ही या निवडणुकीत निर्णायक राहणार आहे.
आजपर्यंत मकरंद पाटील यांनी आमदार शिंदे यांना सहकार्य केला आहे. मात्र जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने त्याची परतफेड आमदार मकरंद पाटील या बाजार समिती निवडणुकीत आमदार भोसले यांना सहकार्य करून करतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आ.शिंदे हे पुन्हा एकदा एकाकी पडणार हे निश्चित. मात्र, संस्थेच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शेतकरी मतदारांची इच्छा असून निवडणूक होणार की जावळीकरांना पुन्हा एकदा संघर्ष पाहावयास मिळणार याविषयी जनतेमध्ये उत्सुकता आहे.
मालोजी शिंदे करणार पॅनेलचे नेतृत्व
या पंचवर्षिक निवडणुकीत मालोजी शिंदे यांनी दंड थोपटले असून त्यांनी यापूर्वी जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन म्हणून काम केलेले आहे. सध्या ते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीत मालोजी शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती निवडणुकीसाठी दंड थोपाटले असून संपूर्ण पॅनेलचे नेतृत्व मालोजी शिंदे यांच्याकडे राहू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मालोजी आण्णा शिंदे यांनी त्या दृष्टीने पॅनलची बांधणी करण्यास सुरुवात केली असून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ,माजी उपसभापती सौरभ बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मालोजी आण्णा शिंदे यांनी बाजार समिती भाजपाच्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय हालचाली सुरू केलेल्या पहायला मिळत आहेत.





