प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना महायुतीमधील जागावाटपाच तिढा अद्याप कायम आहे. आता अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्याप युतीची घोषणा व उमेदवारांची नावे जाहीर झाली नसल्याने इच्छुक संभ्रमांत आहेत. तर नेत्यांच्या भुमिकेमुळे महायुतीमधील जागावाटपाच पेच देखील अद्याप कायम आहे. महापालिका निवडणुकीसाठी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचे जाहीर केले आहे. तर भाजपाने अद्याप शिवसेनेला सोबत घेणार की स्वबळावर लढणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान भाजपच्या वतीने शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत बैठका सुरू असून जागांच्या तिढ्यावर एकमत होत नसल्याचे चित्र आहे. भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे तीन पक्ष एकत्रित महायुतीमध्ये लढणार असल्याची तयारी सुरू आहे. भाजपच्या वतीने शिवसेनेला अंतिमतः १४ जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर आरपीआयला ३ जागा देण्यात येणार असून त्यांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तर उर्वरित १११ जागांवर भाजप लढणार, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यावर शिक्कामोर्तब होऊन युती जाहीर केली नाही. दुसरीकडे, भाजपने ३२ प्रभागातील शेकडो इच्छुकांना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, यामुळे इच्छुकांचे टेन्शन वाढले असून एनवेळी तिकीट कापले तर दुसऱ्या पक्षातून लढायची संधी देखील भेटणार नाही. १२८ एबी फॉर्म दाखल दरम्यान, भाजपच्या शहर कार्यालयात सोमवारी (दि. २९) १२८ एबी पत्र दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजप शिंदेंच्या शिवसेनेला सोडून १२८ जागा लढणार आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या एबी फॉर्मचे वाटप कधी होणार आणि उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.