ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात अश्वांच्या परिक्रमेने बेलवाडीत रंगला रिंगण सोहळा

नीलकंठ मोहिते
इंदापूर –
कवतुके करूणा भाकितसे लडें |
आवडी बोबडे बोलोनिया |
तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा
रंगलो केशवा तुझ्या रंगे |
संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अश्वांच्या परिक्रमेने बेलवाडीत पहिला रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ज्ञानोबा माऊली….ज्ञानोबा माऊली हा पखवाजातुन टाळातून आणि मुखातून येणारा एकसंध आवाज व हरीनामाचा जयजयकार पताकावाले, टाळकरी आणि महिलांसह हा रिंगण सोहळा झाला.
मेंढ्याच्या प्रदर्शिना करून बेलवाडी (ता.इंदापूर) येथील संत तुकाराम महाराज पालखी गोल रिंगणासाठी सोमवार (ता.८ जुलै) रोजी सकाळी 8 वाजून 55 वाजता या सोहळ्याला प्रारंभ झाला. व मानाच्या अश्वाने हरिनामाच्या गजरात काही क्षणाचा विलंब न लावता, तब्बल दोन परिक्रमा पुर्ण करून लाखो लोकांच्या नयणाचे पारणे फेडले.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू गावापासून निघाल्यानंतर पहिल्यांदा, बेलवाडी गावात गोल रिंगण पार पडते. त्या प्रथेप्रमाणे पहिला मान यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाने बहाल केला. यावेळी सणसर गावच्या भैरवनाथ मंदिरातील मुक्काम संपवून, पहाटे पालखीतील पादुकांची महापुजा करून, सकाळच्या प्रहरीच हरीनामाचा घोष करीत गोल रिंगणासाठी पालखी सोहळा बेलवाडी येथे दाखल झाला.
त्यानंतर इंदापूर – बारामती रस्त्यावर गावच्या प्रवेशद्वारावर श्रीराम भजणी मंडळ ,रामकृष्णहरि भजणी मंडळ, व गावकऱ्यांना भजन म्हणत तोफांची सलामी दिली. तर पालखीचे स्वागत सरपंच मयुरी शरद जामदार,उपसरपंच नामदेव इतापे, उद्योजक अर्जुन देसाई, सर्जेराव जामदार, शहाजी शिंदे , ग्रामसेवक एम के करत, युवक नेते शुभम निंबाळकर, मयूर जामदार, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी सचिन खुडे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, प्रांतअधिकारी वैभव नावाडकर,यांच्यासह गावकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या गोल रिंगणासाठी रिंगण स्थळावर मेंढ्यांनी एक परिक्रमा पूर्ण करून, रिंगणाला सुरुवात केली. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने अश्व धावल्यानंतर वारकऱ्यांनी फुगडी, झिम्मा असे वारकरी संप्रदायाचे खेळ खेळले. पालखीतील पादुकांची आरती होऊन, पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी बेलवाडी मूळ गावात दाखल झाला. गावकऱ्यांच्या वतीने वारकऱ्यांना घराघरात अन्नदान करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रोहित मोहोळकर तसेच उद्योजक वसंतराव मोहोळकर यांच्या वतीने,पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. तर नवचैतन्य तरुण मंडळ कर्दनवाडी यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी लापशीचे वाटप करण्यात आले. नेचर डेअरीच्या वतीने वारकऱ्यांना पाणी, दुध, बॉटलचे वाटप करण्यात आले. येथील दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा अंथुर्णेकडे एक दिवसीय मुक्कामासाठी रवाना झाला.





