पुणे जिल्हा | प्राणीमित्राने क्रेनच्या सहाय्याने दिले पक्षाला जीवदान

मंचर, (प्रतिनिधी) – आजकालच्या धावपळीच्या जगात काही घडले तर कुणाला थांबायला वेळ नाही. मात्र, आंबेगाव तालुक्यात मंचर येथे माणुसकीचे दर्शन घडवणारी एक आगळीवेगळी घटना घडली आहे. विजेच्या तारेवर पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या छोट्याशा लहान पक्षाला वाचवण्यासाठी एका प्राणी मित्राने अथक परिश्रम करत क्रेनच्या सहाय्याने त्याला खाली उतरवत जीवदान दिले आहे.
मंचर (ता.आंबेगाव) येथील एसटी स्टँडच्या जवळ महावितरणच्या तारेमध्ये पतंगाच्या दोऱ्यात एक छोटासा पक्षी अडकला होता. हा पक्षी तारेला उलटा लटकलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने जीव वाचण्यासाठी स्वताचा प्रयत्न करत होता.
अनेक जण ये-जा करताना हे दृश्य पाहत होते. मात्र, त्याला वाचवण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. हा पक्षी तारेवर लटकत असताना या पक्षाचा दुसरा मित्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्यांना देखील यश येत नव्हते. काही वेळानंतर ही गोष्ट मंचर येथील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्ते महेश थोरात यांना समजली.
त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. महावितरणची तार उंचावर असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पक्षाला वाचवण्यासाठी खाली उतरवण्यासाठी क्रेन बोलवली व क्रेनच्या ब्रॅकेट मध्ये बसून पक्षापर्यंत जाऊन पक्षाला सुखरूप खाली घेतले. बराच वेळ उलटा लटकत असलेल्या पक्षाचा रक्तश्राव हा उलट्या दिशेने झाल्याने रक्त डोळ्यात, तोंडात आले होते.
त्याला तात्काळ पाणी पाजून वैद्यकीय उपचार देण्यात आले. महेश थोरात या प्राणिमित्रांनी छोट्याशा पक्षासाठी दाखवलेले प्रेम व समय सूचकता यामुळे या पक्षाचे प्राण वाचले. महेश थोरात हे सर्व परिसरात प्राणी मित्र म्हणून नावाजलेले आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक भटके कुत्रे, इतर प्राण्यांना जीवदान दिले आहे. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





