पुणे – बाजार समिती आवाराबाहेरच्या खरेदी-विक्रीस कोणतेही नियम, कर नाही. यामुळे मार्केट यार्डाऐवजी थेट शेतातून खरेदी करण्याची पद्धत रूढ होत आहे. मोठे व्यापारी, मॉलधारक शेतात जाऊन उत्तम शेतमालाची खरेदी करत आहेत. त्यानंतर राहिलेला माल बाजारात येतो. यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डात दुय्यम दर्जाचा माल येण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात दररोज ७० ते १०० ट्र्कची तरकारी विभागात आवक होते. त्यातील ५० टक्के माल दुय्यम दर्जाचा असतो. शेतात उत्तम दर्जाचा माल खरेदी केला तर व्यापाऱ्याला स्वस्तात मिळतो. हाच माल, व्यापारी चढ्या भावाने शहर, उपनगरात विकतात. विशेष म्हणजे दर्जा चांगला असल्याने ग्राहकही दोन पैसे जास्त देऊन खरेदी करतात. दुसरीकडे शेतकऱ्यालाही याचा फायदा होतो. त्याला माल तोडून विक्रीसाठी बाजारात आणण्याची गरज पडत नाही. वाहतूक खर्च, हमाली वाचते. तसेच, माल बाजार समितीत आणल्यास सेसमुळे किंमत वाढते. पूर्वी शेतकरी सेस भरायचे. आता खरेदीदार सेस भरतो. त्यामुळे ग्राहकांना बाजार आवारातील माल महाग पडतो. त्याचा दर्जाही दुय्यम असतो. बाजारात दर्जेदार माल आला तरी तो बाहेरच्या तुलनेत महाग पडतो. परिणामी, दर्जा चांगला असूनही त्याला अपेक्षित गिऱ्हाईक मिळत नाही. त्यातच शेतकऱ्यांचा माल विकताना कमिशन बंद झाल्याने व्यापारीही स्वत:च्या जबाबदारीवर माल विकण्यास तयार नसतात. बाजार आवारातील दुय्यम दर्जाच्या मालाचे प्रमाण जास्त आहे. बाजारात अधिकाधिक दर्जेदार शेतीमाल येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाणार आहे. – सुदर्शन चौधरी, संचालक, पुणे बाजार समिती बाजार समितीत नियमानुसार काम चालते. बाहेर, कोणतेही नियम नाही बाजारात मोठी आवक होत असली, तरीही त्यात दर्जाहीन मालाचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, बाजारात काही प्रमाणात मंदीचे सावट आहे. ते दुर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्यासाठी बाजार आवार नियमनमुक्त करावे ही आमची मागणी आहे. – अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन