धनगर आरक्षण चिघळले; दोन आंदोलनकर्त्यांनी प्रवरासंग नदीपात्रात उड्या घेतल्याची चर्चा

नेवासा – धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाने नेवासा फाटा येथे शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण केले जात आहे. मात्र राज्यव्यापी आमरण उपोषणाकडे पोलीस आणि महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बुधवारी अज्ञातांनी अ.नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर टायर पेटवून संताप व्यक्त केला.
यावेळी महामार्ग अडवून राज्य सरकारचा निषेध नोंदविलेला होता. तर काही अज्ञात आंदोलकांनी महामार्गावर टायर पेटविल्यामुळे नेवासा पोलीसांनी आंदोलनकर्ते प्रल्हाद सोरमोरे आणि बाळासाहेब कोळसे या दोन आंदोलकांवर गुन्हेही दाखल केल्याची माहिती यावेळी आंदोलकांनी दिली आहे.
त्यामुळे या दोन आंदोलकांनी गुरुवारी (दि.२६) रोजी नेवासा फाटा येथे सुरु असलेल्या राज्यव्यापी आंदोलनातून उपोषणास बसलेल्या आपल्या सहकारी उपोषणार्थींना काहीही न सांगता थेट प्रवरासंगम येथील गोदावरीनदी पात्रात जावून जलसमाधी घेतल्याची चर्चा आहे. या दोघा आंदोलकांच्या चप्पला आणि मोटारसायकलही प्रवरासंगम येथील गोदावरी पुलावर मिळून आलेल्या असून एक चिठ्ठीही पोलीसांना सापडल्यामुळे प्रशासनाकडून या दोन आंदोलकांची शोध मोहिम युद्ध पातळीवर सुरु झाली आहे.
दरम्यान, या आंदोलकांच्या जीवाला काही झाल्यास याला प्रशासनच जबाबदार असेल? असा इशाराही यावेळी धनगर आंदोलकांनी ‘दैनिक प्रभात’शी बोलताना दिला आहे.





