Indrayani River: प्रशासनाला जमले नाही; पावसाने स्वच्छ केली इंद्रायणी…..
Indrayani River: इंद्रायणीतील जलपर्णी, कचरा सर्व काही पावसाने वाहून नेले

देहू – गेल्या अनेक दिवसांपासून इंद्रायणीत करण्यात आलेले प्रदूषण सर्वांच्याच चिंतेचे कारण बनले होते. पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि वारकऱ्यांच्या आस्थेचे केंद्र असलेली इंद्रायणी दूषित झाली आहे. वारकरी स्नान आणि आचमन कसे करणार? अशी चिंता व्यक्त होत होती.
प्रशासन देखील इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी संघर्ष करत होते. परंतु जे कोणालाही नाही जमले ते पावसाने करुन दाखविले. दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली. इंद्रायणीतील जलपर्णी, कचरा सर्व काही पावसाने वाहून नेले.
या पुराच्या पाण्याने नदीपात्रातील वर्षानुवर्षे साचलेला कचरा, गाळ आणि इतर घाण वाहून नेत नदीकाठावर आणून टाकली. त्यामुळे प्रशासनाला जे शक्य झाले नाही, ते निसर्गानेच करून दाखवल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान होत असताना इंद्रायणी नदीकाठावर वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
नदीलगतच्या मंदिरांच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल, झाडाझुडपांचा कचरा आणि नदीपात्रातील घाण साचलेली दिसून आली. पुराच्या ओसरत्या पाण्यासोबत हा सर्व कचरा नदीकाठावर येऊन जमा झाला आहे. वारीसाठी लाखो भाविक देहूत दाखल होत असताना नदीकाठ स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.
पावसाने नदीपात्रातील घाण बाहेर काढली असली, तरी ती तातडीने हटवून परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व वारकरी करत आहेत.





