अदानी प्रकरण वैयक्तिक नव्हे; संपूर्ण देशाची बाब, राहुल यांनी केले मोदींना लक्ष्य

रायबरेली : अदानी समुहाशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण वैयक्तिक नव्हे; तर संपूर्ण देशाची बाब आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले. त्या वक्तव्यातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. राहुल यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेली या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात युवकांशी संवाद साधताना अदानी प्रकरणाविषयी भाष्य केले. मोदींनी नुकताच अमेरिका दौरा केला.
त्यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण दाखल आहे. त्यामुळे मोदींना त्यांच्या दौऱ्यावेळी ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत अदानींचा मुद्दा उपस्थित झाला का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. मात्र, वैयक्तिक प्रकरण असल्याने त्यावर चर्चा केली नसल्याचे उत्तर मोदींनी दिले. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी खरे तर संबंधित प्रकरण ट्रम्प यांच्यापुढे उपस्थित करायला हवे होते. गरज असल्यास चौकशीसाठी अदानींना अमेरिकेला पाठवण्याची तयारीही त्यांनी दर्शवायला हवी होती. पण, मोदींनी तसे केले नाही, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.





