पिंपरी | उरण हत्याकांडातील आरोपीवर जलद न्यायालयात खटला चालवा

खालापूर, (वार्ताहर) – उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील आरोपीवर जलद न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार राऊत यांना निवेदन दिले. यावेळी भाजपच्या रायगड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अश्विनी पाटील म्हणाल्या की, उरण येथील यशश्री शिंदे हिची हत्या करून तिचा मृतदेह भयानक अवस्थेत पनवेल येथे टाकून देण्यात आला होता.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे महिला वर्गात चिंतेचे वातावरण असून अशा प्रकारची प्रवृत्तीला पोलीस खात्याने आवर घालण्यात यावा, शासनानेही यावर गांभीर्याने विचार करावा.
यावेळी भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, शहर अध्यक्ष रमेश रेटरकर, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष अश्विनी अत्रे, कर्जत खालापूर समन्वयक हेमंत नांदे, कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख,
ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमिता महर्षी, स्नेहल सावंत, सीमा मोगरे, विभा पाठक, हेमलता करनुक, राजेंद्र दलाल इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस ठाण्यात निवेदन देण्यापूर्वी भाजप कार्यालयात यशश्री शिंदे हीस श्रद्धांजली वाहण्यात आली.





